हिंगोली : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेसने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि मतदारांना संभ्रमित केले अशी लेखी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रज्ञा सावत यांचे राजकीय वलय आहे.
महाविकास आघाडीमधील समन्वयाच्या दृष्टीने प्रज्ञा सातव यांच्या विरोधात शिस्तभंगाची करवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारास पुरक आणि पोषक ठरेल अशी त्यांची भूमिका राहिल्याने काँग्रेस कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. याशिवाय प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या एकाही सभेत हजेरी लावली नाही, असेही वेणू गोपाल यांना लिहिलेल्या पत्रात आष्टीकर यांनी नमूद केले आहे. या अनुषंगाने आमदार प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘ दोन महिन्यानंतर थेट वेणूगोपाल यांच्याकडे तक्रार करण्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा वास येतो आहे. खरे तर मी माझा पक्ष वाढवत असताना आता अशा प्रकारची तक्रार राजकीय अजेंडा आहे. अशा प्रकारे तक्रारी करणे उद्धव ठाकरे गटाची शिकवण आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. हिंगोलीमध्ये अर्ज भरताना मी बाहेरगावी होते. त्यानंतर कळमनुरीमध्ये रॅली झाल्या नाहीत. पण काँग्रेस सर्व कार्यकर्त्यांनी काम केले. मिळालेल्या आघाडीमध्ये काँग्रेसची मते नाहीत, असे नागेश पाटील आष्टीकरांना म्हणायचे आहे का, असा सवाल सातव यांनी केला.
हेही वाचा : कुणी म्हणे मोदींचे कान आणि डोळे, तर कुणी म्हणे ‘सुपर सीएम’; निवृत्त झालेल्या ‘या’ अधिकाऱ्याची एवढी चर्चा का?
नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप विधानसभा निवडणुकीत अधिक जागा ओरबाडण्यासाठी केलेला डाव असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या. हिंगाेली लोकसभा मतदारसंघात नागेश पाटील आष्टीकर हे एक लाख आठ हजार २०३ मताधिक्यानी निवडून आले आहेत. कळमनुरी मतदारसंघातही त्यांना आघाडी होती.