जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने स्वपक्षांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांची महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी हकालपट्टी केली होती. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर त्यातील काही बंडखोरांना पुन्हा सन्मानाची वागणूक दिली जात असताना, एरंडोलमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदाराविरोधात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारासाठी पायघड्या टाकून भाजपने मोठी खेळी खेळली आहे. साहजिकत यातून शिंदे गटात त्यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी प्रत्येकी पाच मतदारसंघातील जागा भाजपसह शिंदे गटाच्या उमेदवारांनी तर एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादीने (अजित पवार) लढवली होती. सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून महायुतीने नंतर आपला दबदबा कायम राखला. दरम्यान, महायुतीच्या बलाढ्य उमेदवारांना आव्हान देऊन स्वतःच्या ताकदीवर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या काही अपक्ष उमेदवारांनी त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राजकीय पक्षांची ताकद पाठीशी राहिली असती तर कदाचित त्या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धूळही चारली असती.
एरंडोल-पारोळा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे भगवान महाजन हे त्यापैकीच एक. राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळीक साधून शासकीय कामांचे कंत्राट घेणाऱ्या महाजन यांची कर्मभूमी धरणगाव असली, तरी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत एरंडोल-पारोळा मतदारसंघातून नशीब आजमावले. अपक्ष उमेदवार शक्यतो राजकीय पक्षांच्या खिजगणतीत नसतात. तशीच अवस्था भगवान महाजन यांची निवडणुकीच्या रणधुमाळीत झाली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक निकालात महाजन यांनी तिसऱ्या क्रमांकाची (सुमारे ४१,३९५) मते मिळवत शिंदे गटाचे उमेदवार आमदार अमोल पाटील यांना एक लाख मतांवर रोखले. दुसरीकडे, महाजन यांच्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे दिग्गज उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा दारूण पराभव झाला. निवडणुकीत विजयी परंपरा कायम राखल्यानंतरही वैयक्तिक शिंदे गट आणि मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्याने शरद पवार गट, या दोघांना भगवान महाजन यांचा एरंडोल-पारोळ्याच्या राजकारणातील प्रभाव त्यामुळे चांगलाच जिव्हारी लागला होता.
असे असताना, भविष्यात युती तुटली आणि शिंदे गटाशी दोन हात करण्याची वेळ आल्यावर महाजन यांच्यासारखा हुकमी एक्का भाजपमध्ये असावा, या हेतुने मंत्री गिरीश महाजन यांनी डावपेच आखले. मुंबई प्रदेश कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भगवान महाजन यांनी एरंडोलचे माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, उपजिल्हा संघटक राजेंद्र चौधरी यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. भगवान महाजन यांच्या भाजप प्रवेशानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.