जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून १०० बुथमागे एक मंडल अध्यक्ष, या सूत्रानुसार जिल्ह्यात ३९ मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीला सध्या गती देण्यात आली आहे. आपण सांगू त्याच व्यक्तीची नियुक्ती मंडल अध्यक्ष पदावर करण्याचा हट्ट काही पदाधिकाऱ्यांनी धरल्यामुळे भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नाराजांची फळी अचानक सक्रीय झाल्याने पक्षनेत्यांची चिंता वाढली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर भाजपमध्ये काही दिवसात मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन मंडल अध्यक्षपद नियुक्त करण्यात येत आहेत.

असे असताना, आपल्याच मर्जीतील कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्या पदावर बसविण्यासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, रावेरचे आमदार अमोल जावळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी त्यांच्या स्तरावर आधीच जोरकस प्रयत्न केले होते. त्यानुसार, संबंधितांच्या मर्जीतील बहुतांश मंडल अध्यक्षांची नियुक्ती जवळपास पूर्ण देखील झाली आहे. परंतु, ज्या तालुक्यात भाजपचे आमदार नाहीत, त्याठिकाणी नवीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागली आहे.

विशेषतः पाचोरा तालुक्यात मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीवेळी मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमोल शिंदे यांनी भाजपसमोर मोठा पेच निर्माण केला आहे. गेल्या वेळी स्वतः शिंदे हे पाचोऱ्याचे मंडल अध्यक्ष होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांचे भाजपमधून निलंबन करण्यात आले होते.

निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर शिंदे आता पुन्हा भाजपमध्ये सक्रीय झाले असले तरी, त्यांच्या शब्दाला आता भाजपमध्ये पूर्वीसारखा मान राहिलेला नाही. मंत्री महाजन यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचाही त्यांना म्हणावा तसा फायदा होऊ शकलेला नाही. परिणामी, यावेळी भाजपने पाचोरा तालुक्यासाठी मंडल अध्यक्षांची नियुक्ती करताना, अमोल शिंदे यांचे मत विचारात न घेता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गोविंद शेलार आणि शोभा तेली यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली.

अशा स्थितीत, नवीन मंडल अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडत असताना नाराज झालेले अमोल शिंदे आणि त्यांचे समर्थक यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. शिंदे यांची भूमिका लक्षात घेता पाचोरा शहर मंडल अध्यक्षांची नियुक्ती त्यामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली. असे प्रकार इतरही काही तालुक्यांमध्ये घडले आहेत. त्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन आता काय भूमिका घेतात, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.