दीपक महाले
जळगाव : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असली, तरी स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत, अशी भूमिका पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी जाहीर केली. अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी थोरल्या साहेबांशी एकनिष्ठ राहिल्याने राष्ट्रवादीचे फारसे नुकसान होणार नाही, असे चिन्ह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात मंगळवारी माजी मंत्री देवकर आणि जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला पाटील, विशाल देवकर, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ, सुनील पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री देवकर यांनी भूमिका मांडली. राज्यातील राजकारणात दोन-तीन दिवसांपासून ज्या घडामोडी घडल्या, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे आपण जळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. सर्वांची मते जाणून घेत संवादही साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात पक्षासमोर शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उमेदवारी करतील. पक्षाला त्यांच्यासमोर निवडणूक लढवायची आहे. आपण सरकारमध्ये गेलो, तर आपल्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण होईल. आपण शरद पवार यांच्यासोबत राहिले पाहिजे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले पाहिजे, अशी भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने मांडली. आपणही त्याच मताचे होतो, असे देवकर यांनी सांगितले.
हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते जवळचे आहेत. अजित पवार यांनीही मदत केली आहे. साहेबांनी आशीर्वाद दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कुटुंब होते. ते एकत्रितपणे काम करीत होते. सर्वच नेते कार्यकर्त्यांना मदत करण्याचे काम करीत होते. त्यामुळेच नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची, हाच खरा प्रश्न निर्माण झाला होता, असे देवकर यांनी नमूद केले.
हेही वाचा… धुळे जिल्ह्यात भाजपचाच फायदाच
जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील यांनी अचानकपणे या राजकीय घडामोडी घडल्या, त्यावेळी आपण पंढरपूरला होतो. त्यामुळे भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री अॅड. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राजीव देशमुख यांच्याशी चर्चा केली. शिवाय, पक्षाच्या विविध आघड्यांचे जिल्हाभरातील तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करीत मते जाणून घेतली. आम्ही शरद पवारांसोबतच आहोत, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहोत, असे अॅड. पाटील यांनी सांगितले.