जळगाव – विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उशिरा का होईना, शिवसेनेने (उध्दव ठाकरे) पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली. मात्र, त्या पदासाठी स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात विधानसभेत बंडखोरी करणारे कुलभूषण पाटील यांना संधी देण्यात आल्याने पक्षाच्या काही जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल थेट पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटातील अंतर्गत वाद त्यामुळे चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत.
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची पडझड थांबवण्यासाठी ठाकरे गटाने कुलभूषण पाटील यांची जळगाव जिल्हाप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती केली. मात्र, पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव शहरातील ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे माहिती असतानाही पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी तर पक्षाकडून लादण्यात आलेल्या नव्या नेतृत्वाला विरोध दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. त्याविषयी स्पष्टीकरण देताना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. वैयक्तिक आपल्याला कोणत्याच पदाची लालसा नाही. मी शिवसैनिक होतो आणि राहणार आहे. परंतु, जळगावच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करताना सावंत यांनी कोणते निकष लावले, पक्षप्रमुखांना त्यांच्याबद्दल काय सांगितले, हे शिवसैनिकांना कळले पाहिजे, असे मालपुरे यांनी म्हटले आहे.
संपर्कप्रमुखांचे आरोपांना प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा माझ्याकडे न देता थेट पक्षप्रमुखांकडे दिला. त्यातही त्यांनी राजीनामा समाज माध्यमात टाकला. एक शिवसैनिक म्हणून त्यांनी तसे करायला नको होते, असे जळगावमधील ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी हकालपट्टीची कारवाई करणे गरजेचे असते. त्यानुसार, जळगावमध्ये कुलभूषण पाटील यांच्यावर कारवाई झाली होती. अलिकडे नाशिक येथे जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीवर चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाची बैठक आयोजित केली होती. त्याठिकाणी कुलभूषण पाटील यांनी हजेरी लावल्यावर त्यांच्या उपस्थितीवर तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. जिल्हाप्रमुखाच्या पदासाठी मालपुरे यांच्यासह कुलभूषण पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती. बैठकीचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्यानंतर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यात वैयक्तिक माझी कोणतीच भूमिका नव्हती, असे सावंत नमूद केले आहे.