जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि अमळनेरच्या जागेवरून महायुतीत आधीच धुसफूस सुरू असताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसने महायुतीत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केली आहे. भाजप आणि शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार न करण्याचा इशारा अजित पवार गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी पाच मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये येवून शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. याशिवाय जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चोपडा या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. अजित पवार गटाने मंत्री अनिल पाटील यांच्यासाठी अमळनेरच्या जागेवर दावा सांगितला आहे. परंतु, भाजपने अजूनही त्या जागेवरील हक्क सोडलेला नाही. परिणामी, अजित पवार गट आणि भाजपमधील धुसफूस वाढली आहे.
हेही वाचा : हरियाणा इम्पॅक्ट, आरक्षण की लोकप्रिय घोषणा; महाराष्ट्र विधानसभेत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार?
या पार्श्वभूमीवर, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची (अजित पवार) बैठक जळगाव येथे झाली. त्यात अमळनेरच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उमटले. बैठकीला माजी आमदार मनीष जैन, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या सर्वच तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि शिंदे गटाकडून कुठेच विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात आपण महायुतीच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करून तालुकाध्यक्षांना योग्य तो सन्मान देण्याविषयीची सूचना करू, असे सांगत जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.