जळगाव: जिल्हाध्यक्ष विरोधकांना अंगावर घेणारा, आक्रमक असणारा, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा हवा तर, विधानसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिन्यांचा काळ असल्याने जिल्हाध्यक्ष बदलू नका, अशा वेगवेगळ्या भूमिका जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत मांडण्यात आल्या. माजी मंत्र्यांनी आपापली भूमिका जाहीर करीत पक्षनिरीक्षकांसमोर पदाधिकार्‍यांची कानटोचणी केली. त्यामुळे दोन्ही माजी मंत्री विधानसभा निवडणुकीसाठी गंभीर असल्याचा संदेश पदाधिकाऱ्यांना मिळून त्यांचा सूरच बदलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवार गटाच्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय चिंतन-मंथन बैठकीत जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष व इतर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव एकमताने झाला होता. त्याअनुषंगाने पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची सर्वांसमक्ष आणि बंद दाराआड मते जाणून घेण्यात आली.

हेही वाचा : राहुल गांधींच्या मणिपूर दौर्‍यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्‍यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?

पक्षसंघटन कमकुवत झाले असल्याने जिल्हाध्यक्ष विरोधकांना अंगावर घेणारा, आक्रमक असावा, नवीन चेहर्‍याला संधी द्यावी, अशी भूमिका काहींनी मांडली. दुसरीकडे, विधानसभा निवडणूक अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर असल्याने जिल्हाध्यक्ष बदलू नका, असेही मत मांडले गेले. पाचोरा येथील नितीन तावरे यांनी जिल्हाध्यक्षपदी सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी. संपर्कप्रमुख व पक्षनिरीक्षकांना तालुका पदाधिकारी माहिती हवेत, असे सांगताना मला ओळखता का, असा थेट प्रश्‍न पक्षनिरीक्षक अ‍ॅड. प्रसन्नजित पाटील यांना करुन त्यांची कोंडी केली. अशा दुमत निर्माण करणार्‍या विधानांवर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी पदाधिकार्‍यांची कानटोचणी करीत पक्षसंघटनेत बदलाला अनुकूलता दर्शवीत नवीन चेहर्‍याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर माजी मंत्री देशमुख यांच्यासमोर पदाधिकार्‍यांच्या बोलण्याचा सूरच पालटला.

हेही वाचा : विधान परिषदेतील मुस्लीम प्रतिनिधित्व संपुष्टात; विधानसभेत तरी योग्य प्रतिनिधित्व देण्याची काँग्रेस नेत्यांची अपेक्षा

माजी मंत्री डॉ. पाटील यांनी, आपापली भूमिका मांडणार्‍यांपैकी त्यांनी गावात कोणी किती मताधिक्क्य मिळवून दिले, हे शोधा, असा सल्ला दिला. पाच वर्षांत आमदार मंगेश चव्हाण हे हजारो कोटींचे मालक कसे झाले, असा प्रश्‍न उपस्थित करीत चव्हाण यांचा इतिहास काढा, असे पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. माजी मंत्री देवकर यांनी नवीन प्रामाणिक जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी केली. माजी मंत्री देशमुख यांनी, जिल्ह्यात पक्षाचे 2009 मध्ये पाच आणि २०१४ मध्ये एक आमदार होते. २०१९ मध्ये एकच निवडून आला. मात्र, तोही गेला. आता २०२४ मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत, असे आवाहन पदाधिकार्‍यांना केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon ncp sharad pawar leader anil deshmukh slam local leaders ahead of assembly elections print politics news css
Show comments