जळगाव – विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील राजकीय आखाडा गाजवण्यासाठी महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आतापासून सज्ज झाले आहेत. भाजपने जामनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत त्याची दणक्यात सुरुवात केली असताना दुसरीकडे, महाविकास आघाडीत निवडणूक निकालांपासून आलेली मरगळ अजूनही कायम आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत रावेर आणि जळगावची जागा जिंकल्यानंतर, विधानसभेच्या निवडणुकीतही सर्व ११ जागा जिंकत महायुतीने जळगाव जिल्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचा आत्मविश्वास त्यामुळे वाढलेला असताना, तुलनेत महाविकास आघाडीमध्ये कमालीची मरगळ आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी (शरद पवार) तसेच शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कोणत्याच मोठ्या नेत्याने जिल्ह्यास भेट देऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना धीर देण्याचे, त्यांची हिंमत वाढविण्याचे काम विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर केलेले नाही.
दुसरीकडे, भाजपने सदस्य नोंदणी अभियानाला गती देतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत खान्देशस्तरीय विभागीय मेळावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करत पक्षाला पुन्हा नवी उभारी दिली आहे. लोकसभेनंतर विधानसभेत मिळालेल्या यशाने हुरळून न जाता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्येही यशाची पताका फडकावण्यासाठी भाजप कामाला लागल्याची प्रचिती त्यातून आली. भाजपनंतर, शिवसेना (एकनाथ शिंदे) देखील आता झपाटली असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आभार सभा जळगावमध्ये आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा
भाजपसह शिंदे गटाकडून पक्ष संघटन वाढीसाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे दौरे आयोजित करण्यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही आता सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे. याशिवाय पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) संघटन वाढवण्यासाठी जळगाव जिल्हाभरात गाव तेथे शाखा आणि घराघरात शिवसैनिक, या संकल्पनेवर आधारित सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातील आभार दौरा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरेल. – गुलाबराव पाटील (ज्येष्ठ शिवसेना नेते तथा पालकमंत्री, जळगाव)