जालना : आंतरवली सराटीमध्ये राज्यातील २३ मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी गुरुवारी गर्दी केली. गटागटाने लोक यायचे, जरांगे पाटील त्यांना एका उमेदवारांचे नाव नक्की करुन या असे सांगायचे, मग लोक पुन्हा एखाद्या झाडाखाली बसून गटागटाने चर्चा करायचे. पुन्हा एकमत झाल्याची उदाहरणे तशी नव्हतीच त्यामुळे उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेत जरांगे यांचा गुरुवारचा दिवस गेल्याचे चित्र होते. विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी तसेच उमेदवारी जाहीर करण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी २३ जिल्ह्यातील इच्छुक आले होते आणि उर्वरित जिल्ह्यातील इच्छुक दुसऱ्या टप्प्यात येणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांशी चर्चा करण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले, कुठे उभे करायचे, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात उमेदवार उभे न करता तेथे कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुठे उमेदवार उभे न करता पाडायचे यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मतदारसंघात एकच उमेदवार उभा करावा, असे आपण सर्वांना सांगितले आहे. महायुतीमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली ते आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही तेही पाठिंबा मागण्यासाठी येत आहेत. २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा आपण निवडणुकीची समीकरणे जुळण्याच्या संदर्भात समाज बांधवांशी चर्चा करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून १५ जणांचा गट उमेवारी मागण्यासाठी आला होता. त्यांना एक उमेदवार नक्की करुन आणा असे सांगण्यात आले. त्यांनी खूप वेळ चर्चा केली. उत्तर काही सापडले नाही. मग ते आपण पुन्हा चर्चा करू असे म्हणून निघून गेले.बहुतांश मतदारसंघातील चर्चा अशाच पद्धतीने होत होती. जरांगे यांच्या पोलीस बंदोबस्तामध्येही गुरुवारी वाढ करण्यात आली होती.
हेही वाचा : Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?
ज्यांना उमेदवारी अर्ज भरून ठेवायचे त्यांनी ते भरून ठेवावेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर उमेदवार कोणता ठेवायचा ते जाहीर करू आणि इतरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल. कोणत्या मतदार संघात निवडणूक लढवायची ते आजच सांगता येणार नाही. ३० ऑक्टोबर रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकानंतर हे स्पष्ट करण्यात येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले. केवळ एका जातीवर निवडणुकीत यश मिळणार नाही.
हेही वाचा : सूरत, गुवाहाटीपर्यंत साथ देणाऱ्या ४१ पैकी ३७ आमदारांना शिंदेंकडून पुन्हा उमेदवारी; उर्वरित चार जणांचे काय?
केवळ एकाच जातीच्या आधारे निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस आपण अन्य जातींबरोबरची समीकरणे जुवळून आणण्यासाठी पुढील दोन दिवस काम करणार असल्याचे जरांगे यांनी शुक्रवारी सांगितले. पुढील काळात किती मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आणि किती मतदारसंघात पाडायचे याचा हिशेब मांडला जाईल हे ठरवू असेही ते म्हणाले.