जालना : शैक्षणिक वर्षापासून जालना येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर यासाठी श्रेय घेण्याच्या प्रश्नावरून या विधानसभा मतदार संघातील प्रमुख नेत्यांमध्ये चढाआेढ सुरू झाली आणि त्यामुळे आगामी निवडणुकीचा हा एक प्रमुख मुद्दा असेल हे स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे उपनेते (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांनी स्वत:कडे याचे श्रेय घेतले. तसेच त्यांच्या अभिनंदनाचे फलकही शहरात झळकले. अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेली पत्रकार परिषद स्वत:पुरतीच मर्यादित ठेवण्याएवजी तिला ‘महायुती’चे स्वरुप दिले. खोतकर यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे या दोघांनाही सोबत घेऊन खोतकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. गोरंट्याल यांना मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु महाविद्यालय मंजुरीचे श्रेय मात्र केंद्र आणि राज्यातील सध्याच्या सरकारचे कसे आहे याचा तपशील त्यांनी दिला. अरविंद चव्हाण आणि भास्कर दानवे यांनीही हे श्रेय केंद्र आणि राज्यातील सरकारांसोबत रावसाहेब दानवे यांनाही दिले.

हेही वाचा : राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील अंतर अधिक वाढल्याचे दिसत होते. परंतु गोरंट्याल यांच्या विरोधात खोतकर यांच्या पत्रकार परिषदेस रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि भाजपचे कांही पदाधिकारी उपस्थित होते. भाजपची जिल्ह्यातील नेतेमंडळी रावसाहेबे दानवे यांच्या परवानगीशिवाय हजर राहिली नसती एवढा कयास कुणीही करू शकेल.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण हे महायुतीचा घटक पक्ष म्हणून या पत्रकार परिषदेस उपस्थित राहिले. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अर्जुन खोतकर यांच्याशिवाय भास्कर दानवे आणि अरविंद चव्हाण हे दोघेही जालना विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. महायुतीतील हे तिन्ही पुढारी एकत्र आल्यावर तिघांपैकी उमेदवार नेमका कोण असेल ? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून येणे अपेक्षित होता. त्यावर खोतकर यांचे उत्तर होते, भास्कर दानवे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे काम करीन आणि अरविंद चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार प्रमुख राहील.

हेही वाचा : Ram Rahim : निवडणूक जिंकायची असेल तर बलात्कारी राम रहिमला पॅरोलवर बाहेर काढा, भाजपाचं हे सूत्र नेमकं आहे तरी काय?

महायुतीमधून जालना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले हे तिन्ही पुढारी सध्या स्वतंत्रपणे मतदार संघात फिरत आहेत. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयावर काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांनी दावा केल्यानंतर ते अनेक महिन्यांनी एकत्र आले.