छत्रपती संभाजीनगर : घराच्या समोर प्लास्टीकच्या दोन – तीन टाक्या मांडून ठेवलेल्या. ठराविक अंतराने फिरणारे टँकर दिसतात जालना लोकसभा मतदारसंघात. भोकरदन परिसरातील राजूर परिसरातील दहा किलोमीटरच्या परिघातील साऱ्या विहिरी कोरड्या पडलेल्या. शुष्क प्रदेशात पारा ४० अंशापेक्षा जास्त असताना निवडणूक प्रचाराचा तसा मागमूसही सापडत नाही. काही गावांमध्ये विजेच्या खांबांना बांधलेले भगवे आणि निळे झेंडे एवढेच काही ते निवडणुकीचे रंग. निवडणुकीवर कोणी बोलत नाही. कोणी नेता गावात आलाच तर तेवढ्या पुरते लोक गोळा होतात. मग पुन्हा लोक वाट पाहत राहतात टँकरची. जालना गावातील आम्रपाली बोर्डे म्हणाल्या, ‘दिवसभरातील तीन- चार तास जातात पाणी आणण्यात.’ निवडणुकीपेक्षाही पाणी टंचाईशी दोन हात करणे हा प्राधान्यक्रम आहे. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे विरुद्ध कॉग्रेसचे कल्याण काळे यांच्यामध्ये लढत आहे.
हेही वाचा : भाजपा नेत्यांनाही नकोयत ३७० खासदार!
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तलावात पाणीसाठाच शिल्लक नाही. सारे जगणे टॅँकरच्या भरवशावरचे. सोमीनाथ राठोड तीन – चार वर्षापासून टँकरचे ड्रायव्हर म्हणून काम करतात. राजूरपासून पाच किलोमीटरवरुन बाणेगाव त्यांचे टॅँकर थांबलेले. त्यांच्याबरोबर सुधाकर ठोंबरे, सय्यद हबीब ही मंडळीही टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी थांबलेली. टँकर चालकांची भर दुपारी गप्पांचा फड जमतो. पण त्यातही राजकारण तसे नसतेच. लिंबाच्या झाडाला घरुन आणलेला डबा लटकवून सोमिनाथ म्हणाला, ‘ आमचं सगळं आयुष्य लाईटीवरचं. म्हणजे जेव्हा लाईट असेल तेव्हा टँकरमध्ये पाणी भरायचं. ज्या गावातून पाणी संपते तेव्हा फोन सुरू होतात. त्यामुळे कधी चार वाजता उठतो पळतो तर कधी भर दुपारी पळावं लागतं.’ सोमिनाथचा पगार १७ हजार रुपये. गाडीमध्ये काही बिघाड झाला नाही. टायर पंचर झाले नाही तर दोन किंवा तीन फेऱ्या एका गावात होतात. ते पाणी मोटारीने गावातील टाकायचे. आता विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे बाणेगावातील गावातून एक किलोमीटरवरुन पाईपने टँकर भरण्याची सोय केलेली. एक टँकर भरायला तासभराचा वेळ. पुढे तो रिकामा करायचा आणि नव्याने ‘ पॉईट’ पर्यंत जायचं.
हेही वाचा : माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू सेक्स स्कँडलमध्ये? कर्नाटकात राजकीय वर्तुळात खळबळ
आता प्रत्येक गावातील छोट्या हॉटेल चालकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पाच हजार लिटरच्या टँकर १२०० रुपयांना. प्रत्येक गावात पाणी बाजार तेजीत आहे. पण आता टंचाई हा मुद्दा अंगवळणी पडला आहे. लोक चिडत नाहीत, ओरडत नाहीत. वाट पाहत राहतात टँकरची. जानेवारी महिन्यात जसे टँकर सुरू झाले तसे बियाणांच्या दुकानात शुकशुकाट जाणवू लागला. त्याला आता चार महिने झाले आहेत. राजूरमधील विक्रेते म्हणाले, ‘ आमचा भाग तसा भाजपचा आहे. फार तक्रार नाही आमची. या सरकारने शेतीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. भावच नाही मिळाले शेती पिकांना. त्यामुळे सारे काही आक्रसले आहे. ? ’