भगवान मंडलिक
कल्याण : राज्यात नऊ महिन्यांपुर्वी घडलेल्या सत्ताबदलानंतर राज्यभरासह ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय गणितेही कमालिची बदलली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार ठाणे, कल्याणात सुरु झाल्याने राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेला भाजप स्थानिक पातळीवर मात्र अस्वस्थ दिसू लागला आहे. मात्र ही अस्वस्थता केवळ भाजपपुरती मर्यादित राहीलेली नाही. राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेत वेगळी चुल मांडल्यापासून गेली दशकभरापेक्षा अधिक काळ स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपशी दोन हात करणारे मनसैनिक कमालिचे अस्वस्थ दिसू लागले असून फुटीनंतर ‘एकटे’ पडलेल्या उद्धव ठाकरे यांना या अस्वस्थ नवसैनिकांचे बळ मिळू लागल्याचे चित्र आता कल्याणात दिसू लागले आहे.
कल्याण डोंबिवलीतील मनसेतील पदाधिकाऱ्यांचा एक मोठा गट नुकताच मातोश्रीवर दाखल झालेला पहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात विशेषत: ठाणे आणि डोंबिवलीत जुन्या शिवसेनेला अक्षरश: भगदाड पडल्यासारखे चित्र आहे. एकेकाळी मातोश्रीशी जवळीक साधून असणारे अनेक पदाधिकारीही शिंदे यांच्या तंबूत दाखल होताना दिसत आहेत. मागील १५-१७ वर्ष शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सर्व सुत्र मातोश्रीवरुन सोपविण्यात आली होती. त्यामुळे गल्लीबोळातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अनेक दुखऱ्या बाजूही शिंदे चांगलेच ओळखून आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरातील अनेक स्थानिक पदाधिकारी केवळ आपल्या पुर्वइतिहासामुळे नवीन अडचण नको या विचाराने शिंदे गटात स्थिरावल्याचे चित्र आहे. कल्याण, डोंबिवलीत तर शिंदे पुत्र खासदार श्रीकांत यांनी जातीने लक्ष घालत शाखाशाखांमधून उद्धव सेनेला भगदाड पाडले आहे. त्यामुळे ठाण्यापेक्षा कल्याणात आणि विशेषत: डोंबिवलीत ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. हा इतिहास ताजा असला तरी गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीतील मनसैनिकांनी ठाकरे यांची साथ सुरु केल्याने स्थानिक पातळीवर बदललेल्या या राजकारणामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा… राणा दांम्पत्याची राजकीय वाटचाल काटेरी वळणावर?
मनसैनिक अस्वस्थ का ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कल्याण शहराचे जुने नाते राहीले आहे. ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला जुना शिवसैनिक आजही कल्याण, डोंबिवलीच्या शाखाशाखांमधून दिसतो. ठाकरे आणि शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला पुर्वाश्रमीचा शिवसैनिकाच्या घरातील एक मोठा तरुण वर्ग राज ठाकरे यांच्या बंडात त्यांच्यासोबत राहीला. उसळत्या रक्ताच्या या तरुणांनी राज यांच्या मोहिनीला भुलून मनसेत भराभर उड्या घेतल्या, यामुळे अनेक घरात तेव्हा विसंवाद झाल्याचे पहायला मिळाले. वडील शिवसेनेत तर मुलगा मनसेत असे चित्र कल्याणात शाखाशाखांमधून दिसायचे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातून मनसेचे दोन ( कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम) आमदार निवडून आलेले पहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. नाशीक पाठोपाठ मनसेला मोठी साथ देणारे शहर म्हणून कल्याण, डोंबिवलीची ओळख होती. मात्र नाशीकला जे झाले तेच पुढे कल्याणात मनसेच्या बाबतीत घडले. पक्षातील गटातट, चढाओढीचे राजकारण, एकमेव आमदार राजू पाटील आणि स्वत: राज यांचे दुर्लक्ष दर्शन यामुळे अस्वस्थ मनसैनिक मातोश्रीची पायरी चढताना दिसू लागले आहेत.
हेही वाचा… मुंबईत पक्ष वाढीसाठी स्वत: शरद पवार यांनी लक्ष घातले
पाटीलांची नाराजी ठाकरे सेनेच्या पथ्यावर
मध्यंतरी पत्रीपुलाजवळील नेतिवली टेकडीवरील बेकायदा झोपड्या रंगविण्यासाठी पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला होता. याच बेकायदा झोपड्यांपासून एक किमी अंतरावर असलेल्या शहर संघटक रुपेश यांच्या कल्याण मधील कार्यक्रमास मात्र ते आले नाहीत. आपण भले आपला मतदारसंघ भला अशा पद्धतीने कामकाज करणाऱ्या पाटील डोंबिवली, कल्याणातील दोन मतदारसंघात अपवादानेच दिसतात. तेथील कार्यकर्त्यांना राज यांच्या प्रमाणेच आमदार पाटीलही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. नेमकी हीच नाराजी उद्धव सेनेच्या पथ्यावर पडू लागली आहे. स्थानिक पातळीवर शिंदे समर्थक आणि भाजपशी दोन हात करायचे म्हणून मनसेत राहीलो. परंतु राज यांची बदलती भूमीका आमदार पाटील यांच्याकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने शिंदेसेनेपेक्षा जुन्या शिवसेनेची दारे ठोठविताना मनसैनिक दिसू लागले आहेत.
हेही वाचा… एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने
आमच्या घरात शिवसेनाप्रमुखांचे विचार रुजले आहेत. त्या विचारामुळे आम्ही आमच्या मूळ स्थानी गेलो. मनसेत असताना स्थानिक नाहीच प्रदेश नेत्यांकडून पक्ष वाढीसाठी कार्यक्रम नाही. कार्यक्रम लावले तरी नेत्यांची पाठ, गटातटाचे राजकारण यामुळे मनसेला रामराम ठोकला. – रुपेश भोईर, शिवसैनिक.
आगामी पालिका निवडणुका, बहुसदस्य प्रभाग पध्दती, मुस्लिम मतांचा विचार करुन कल्याण मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी मतांची गणिते करुन ठाकरे गटात जाणे पसंत केले. – मनोज घरत, शहराध्यक्ष, मनसे, डोंबिवली.