कर्नाटकात भाजपमध्ये घराणेशाहीला प्राधान्य, येडियुरप्पानंतर बोम्मई पुत्राला उमेदवारी

काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार खिल्ली उडवत असतानाच कर्नाटक भाजपमध्ये मात्र घराणेशाहीलाच पक्षाने प्राधान्य दिलेले दिसते.

in Karnataka BJP nominated basavaraj bommai son bharat bommai
माजी मुख्यममंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुत्राला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)

काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार खिल्ली उडवत असतानाच कर्नाटक भाजपमध्ये मात्र घराणेशाहीलाच पक्षाने प्राधान्य दिलेले दिसते. येडियुरप्पा यांच्या पुत्राला प्रदेशाध्यक्षुपदी नेमल्यानंतर माजी मुख्यममंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुत्राला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री बोम्मई यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने बोम्मई यांचे पुत्र भरत यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या हट्टानंतर त्यांचे पुत्र बी. वाय. विजेयंद्र यांची भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली. विजेयंद्र विधानसभेचे आमदार आहेत. येडियुरप्पा यांचे दुसरे पुत्र बी. वाय राघवेंद्र हे शिमोगा मतदारसंघाचे खासदार आहेत. यानुसार येडियुरप्पा यांचे एक पुत्र खासदार तर दुसरे पुत्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आहेत. येडियुरप्पा यांच्यावरच ठपका येऊ नये म्हणून बहुधा दुसरे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पुत्र भरत बोम्मई यांची पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवारी जाहीर केली. बोम्मई यांनी आधी मुलाला उमेदवारी दिली जाणार नाही, असे सांगितले होते. पण पक्षाने बोम्मई यांची घराणेशाही मान्य केलेली दिसते.

आणखी वाचा-Satyendar Jain : सत्येंद्र जैन १८ महिन्यानंतर तुरुंगामधून बाहेर; दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला बळ मिळेल का?

काँग्रेस किंवा अन्य प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाहीच्या विरोधात पंतप्रधान मोदी सातत्याने टीका करतात. गांधी घराण्याची खिल्ली उडवतात. भाजपमध्ये घराणेशाही नव्हे तर सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते, असे अभिमानाने दावा करतात. पण कर्नाटकात नेमके त्याच्या विरोधी चित्र आहे. येडियुरप्पा आणि बोम्मई या दोन माजी मुख्यमंत्र्यांची घराणेशाही भाजपला मान्य असावी. बोम्मई यांच्या पुत्राला निवडणूक रिंगणात उतरवून ही जागा राखण्याचा भाजपने प्रयत्न केला असावा.

हरियाणामध्ये नवीन मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रुती चौधरी आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांची कन्या आरती राव या घराणेशाहीतून पुढे आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.

आणखी वाचा-अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये चढाओढ

राज्यात नेत्यांच्या मुलांसाठी आग्रह

राज्य भाजपमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना खासदारकी व आमदारकी देण्यात आली. दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम या खासदार होत्या. रावसाहेब दानवे, अरुण अडसड, दिवंगत पांडुरंग फुंडकर या नेत्यांची मुले आमदार आहेतच. बबनराव लोणीकर यांचे पुत्र पक्षात पदाधिकारी आहेत. विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलांना उमेदवारी मिळावी यासाठी काही नेतेमंडळींचा आग्रह आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In karnataka bjp nominated basavaraj bommai son bharat bommai print politics news mrj

First published on: 20-10-2024 at 17:24 IST
Show comments