कर्नाटकामध्ये विधानपरिषदेच्या सात जागांसाठी ३ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने तीन नवे चेहरे आणि एक माजी उपमुख्यमंत्री यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. बी.एस येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय विजेंद्र यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
विजयेंद्र यांच्याकडे दुर्लक्ष
कर्नाटक भाजपाने पक्षात नाराजी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधीच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या उमेदवारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी,नारायणस्वामी, हेमलता नायक, एस केशवप्रसाद यांची निवड केली आहे. अपेक्षेप्रमाणे, भाजपाचे लिंगायत समजातील बलवान नेता असणाऱ्या येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे दुर्लक्ष केले. मे महिन्याच्या सुरवातीला राज्य भाजपा युनिटच्या कोअर कमिटीने प्रस्तावित उमेदवारांच्या १५ जणांच्या यादीमध्ये विजयेंद्र यांचे नाव होते. पक्षाकडून गेल्या आठवड्यातच संकेत देण्यात आले होते की विजयेंद्र यांची उमेदवारी ही पक्षाच्या घराणेशाही बाबतच्या धोरणाच्या विरुद्ध आहे म्हणून विधानपरिषदेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा विचार करण्यात येईल. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्त होणे अपेक्षित आहे.
पक्षात जोरदार लॉबिंग
कर्नाटकमधील विधानपरिषदेच्या जागांसाठी पक्षातून जोरदार लॉबिंग झाल्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यास उशीर झाला. लिंगराज पाटील हे आपली निवड होणार हे गृहीत धरून सकाळी पक्षकार्यालयात पोचले मात्र पक्षाने पाटील यांच्या ऐवजी सवदी यांची निवड केली. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत सवदी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले गेले होते. परंतु २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि मग येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उप मुख्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले. २००८ ते २०१३ याकाळात भाजपाची सत्ता असताना दोन मंत्र्यांवर सभागृहात अश्लील छायाचित्रे पाहण्याचा आरोप करण्यात आला होता. त्या दोन मंत्र्यांमध्ये सवदी यांचा समावेश होता.
कर्नाटकमध्ये विधानपरिषदेच्या ७ जागांसाठी ३ जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभेचे २२४ सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. १२१ आमदार असलेला भाजपा सात पैकी चार जागा जिंकू शकतो. ६९ आमदारांसह काँग्रेस २ जागा आणि ३२ आमदारांसह जेडीस १ जागा जिंकू शकतो. काँग्रेसने ओबीसी समाजाचे एम नागराजू यादव आणि अल्पसंख्यांक समुदायाचे अब्दुल जब्बार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.