दयानंद लिपारे
कोल्हापूर : सरकार, लाट कोणतीही असो बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी बंधूंची आमदारकी आणि घरातील मंत्रिपद मात्र कायमपणे राहणारच. गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ त्यांचा सर्वपक्षीय राजकारणाचा डंका वाजत आला आहे. एकेकाळी दबंग पार्श्वभूमी असणाऱ्या या कुटुंबाला बाजूला सारून आता बेळगाव जिल्ह्याचेच सत्ताकारण होताना दिसत नाही. सतीश जारकीहोळी यांना सिद्धरामय्या मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट केल्याने याचा ताजा प्रत्यय आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील राजकारणात काही कुटुंबियांचे वर्चस्व कायम राहिले आहे. कत्ती, कौजलगी, अलीकडे जोल्ले या कुटुंबीयांनी राजकारणात प्रभाव निर्माण केला आहे. त्यात जारकीहोळी कुटुंबाचे प्रभुत्व अधिक उठावशीर. रमेश, सतीश, भालचंद्र, भीमाशी आणि लखन हे पाच बंधू राजकारण, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य यामध्ये चमकत आहेत. त्यांचे वडील दिवंगत लक्ष्मण जारकीहोळी हे अबकारी विभागाचे मक्तेदार. बेडर नायक (वाल्मिक ) असा त्यांचा गौरव केला जात असे. ते कर्नाटकातील अर्का या देशी दारूचे प्रमुख गुत्तेदार. जारकीहोळी – करनिंग या कुटुंबातील रक्तरंजित संघर्ष एकेकाळी भलताच गाजला होता. आता हा प्रवास प्रबोधनाच्या टप्प्यावर येताना दिसत आहे.
हेही वाचा… भाजपची ७३ विधानसभा मतदारसंघांत अन्यपक्षीय उमेदवारांवर भिस्त?
सर्वपक्षीय संचार
या बंधूंच्या राजकारणाचे बीजारोपण झाले ते जनता दलातून. पुढे सतीश जारकीहोळी यांची पक्षातील ज्येष्ठ सिद्धरामय्या यांच्याशी जवळीक वाढली. कुमारस्वामी यांच्याशी सूर बिनसू लागल्यावर सिद्धरामय्या यांनी राजकीय पक्ष काढण्याचा घाट घातला. निवडणुकीतले अर्थकारण लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसची वाट धरण्याचा निर्णय घेतला; तेव्हा त्यांच्यासोबत सतीश राहिले. जारकीहोळी बंधूंच्या राजकारणाची वेगळी जातकुळी म्हणजे त्यांना कोणता पक्ष वर्ज्य राहिला नाही. आताही रमेश हे गोकाक मतदार संघातून, भालचंद्र हे आरभावी मतदारसंघातून (पूर्वी जनता दलाकडून) अलीकडे सातत्याने भाजपकडून निवडून येत आहेत. सर्वात धाकटे लखन हे अलीकडेच काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. तेच कुटुंबाचे व्यवहार बरेचसे व्यवहार पाहत असतात. चतुर्थ क्रमांकाचे भीमाशी यांनी २००८ मध्ये थोरले बंधू रमेश यांच्या विरोधात निवडणूक लढवून पाहिली. त्यात अपयश आल्यानंतर ते गोकाक येथील शैक्षणिक संस्थांचे कामकाज पाहण्याकडे वळले. तसे या बंधूंनी भक्कम साखर पेरणी करून पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर कर्नाटकातील राजकारणात पोत सांभाळला आहे. सतीश शुगर, बेळगाव शुगर, घटप्रभा सहकारी साखर कारखाना, सौभाग्य लक्ष्मी शुगर हे कारखाने त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात. जे अँड जी माइन्स अँड मिनरल्स एक्सपोर्ट नावाची कंपनी सुरू केली होती. संजीवनी वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते. गोकाक स्टील्स लिमिटेडवरही या कुटुंबाचे वर्चस्व होते. गोकाक परिसरात कला, वाणिज्य, विज्ञान, विधी विषयक शिक्षण संस्था त्यांनी सुरू करून युवक, तरुणांशी जवळचा सबंध ठेवला आहे.
हेही वाचा… भाजप, काँग्रेस प्रवास केलेले आशिष देशमुख पुन्हा भाजपवासी ?
हे बंधू काहीवेळा वादात गुरफटले. मागील मंत्रिमंडळात रमेश यांच्यावर अश्लील चित्रफितीत सहभाग असल्याच्या कारणावरून वादंग उठले. त्यांना मंत्रिपदाला मुकावे लागले होते. सतीश यांनी हिंदू शब्दाच्या व्युत्पत्तीवरून केलेले भाष्य वादग्रस्त ठरले होते. तथापि गेल्या २० वर्षात सतीश यांचा सामाजिक, राजकीय खूपच दृष्टिकोन बदलला आहे. परिवर्तन, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख बनली आहे. दरवर्षी ते बेळगाव स्मशानभूमीत समूह भोजन आयोजित करतात. देशभरातील विचारवंतांची यावेळी हजेरी असते. अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी त्यांचे केवळ प्रयत्न नसतात तर त्याला कृतीची जोड असते. निवडणूक प्रचार असो कि राजकारण त्यामध्ये बाबा – बुवा यांचे प्रस्थ वाढले असताना सतीश हे मात्र सत्यशोधक विचाराने पुढे जात असतात. त्याला जनतेचेही मोठे पाठबळ मिळत असते हे त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लाखाहून अधिक मतांच्या विजयाने सिद्ध केले आहे.
हेही वाचा… जालन्याचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यावरून काँग्रेस व शिंदे गटात जुंपली
२००५ पासून मंत्रिपद कायम
२००५ सालापासून सातत्याने जारकीहोळी घराण्याकडे मंत्री पद कायम आहे. जनता दल, काँग्रेस, काँग्रेस – जनता दल, भाजप – जनता दल, पुन्हा कॉंग्रेस अशी सत्तांतरे कन्नड भूमीत होत राहिली. तरी जारकीहोळी घराण्यात कोणाला ना कोणाला मंत्रीपद मिळत आले आहे. मागील निवडणुकीच्या वेळी सिद्धरामय्या हे रमणी मतदारसंघातून पराभूत झाले होते. तथापि बदामीतून त्यांचा विजय सुकर झाला तो सतीश यांच्यामुळे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ११ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यात सतीश जारकीहोळी यांना श्रेय दिले जाते.
बेळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये कोणी हस्तक्षेप करू नये, अशी जारकीहोळी बंधूंची अपेक्षा असते. मागे डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्यात लक्ष घातले असता रमेश जारकीहोळी यांच्याशी त्यांचे फाटले होते. शेवटी रमेश जारकीहोळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व मंत्रिपद पटकविले होते. सतीश जारकीहोळी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जातात. बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत आपल्याला वगळून राजकारण करता येणार नाही हे सतीश जारकीहोळी यांनी दाखवून दिले आहे.