कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील आजरा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती तोळामासा. कर्जाचा डोंगर पाहता कारखान्याच्या सत्तेत सहभागी व्हावे की नको असा प्रश्न सुज्ञांना पुनःपुन्हा पडावा. अशाही या कारखान्याच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणाचे अर्कचित्र पाहायला मिळत आहे. कालपर्यंत हातात हात घालणारे हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे सहकारातील मित्र आता एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस यांनी हातात हात घातला आहे. तर, त्यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्यासाठी गळाभेट घेतली आहे.
आजरा साखर कारखाना गेली काही वर्ष आर्थिक पातळीवर झुंजत आहे. आर्थिक नियोजन फसल्याने या कारखान्याचे गाळप दोन वर्ष बंद होते. तालुक्यातील नेत्यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी सहकार्य केल्याने कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटले. त्यासाठी कामगार, हितचिंतकांनी चांगले सहकार्य केले. कर्जाचा भलामोठा डोंगर खांद्यावर असताना कारखान्याचे गाळप सुरू झाले. उत्पन्नाची बाजू तोकडी आणि खर्चाला फुटणारे पंख अशा विषम परिस्थितीत कारखाना चालवणे हे एक दिव्य आहे. संचालक मंडळात हि तारेवरची कसरत करावी लागते आहे. कारखान्यावर सुमारे १५० कोटीचे कर्ज आहे. हा विसविशीत अर्थआवाका पाहून कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे अनेक दिवसांपासून गाठीभेटी सुरू होत्या.
हेही वाचा : तीन राज्यांमधील विजयानंतर राज्यातील भाजपचा अधिक जागांवर दावा ?
राष्ट्रवादीतील नाट्य
उमेदवारांबाबत एकमत करण्यासाठी मुश्रीफ,पाटील, कोरे यांच्याकडे बैठकसत्र सुरु होते. उमेदवारीबाबत मतैक्य होऊन निवडणूक बिनविरोध होणार अशीच स्थिती होती. निवडणुकीला अनपेक्षित वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतुन माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. तो टिकला अवघा दिवस. राष्ट्रवादीच्या काही प्रमुखांना निवडणूक लढवण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यांनी दुसऱ्या दिवशी पक्षनेते मुश्रीफ यांची भेट घेऊन निवडणूक लढवणे का गरजेचे आहे याचे निरूपण चालवले. मुश्रीफ मात्र आर्थिक समस्या कथन करीत राहिले. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मुश्रीफ यांना संमती देणे भाग पडले. हो ना करीत राष्ट्रवादीही आता या निवडणुकीत उतरली आहे. त्यावर, अन्य कोणाला सत्तेत घेण्यापेक्षा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची एकविचाराची सत्ता आणण्यासाठी हा खटाटोप असल्याची सभासदांमध्ये चर्चा होत राहिली.
हेही वाचा : तेलंगणातील पराभवाने भारत राष्ट्र समितीच्या राज्यातील नेत्यांमध्ये चलबिचल, एमआयएममध्येही चिंता
सत्तेसाठी गळ्यात गळा
कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांमध्ये सहकारातील गोकुळ, जिल्हा बँक पासून ते अगदी ताज्या भोगावती कारखान्यातही हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे आजी- माजी पालकमंत्री एकत्रित लढत आहेत.आता इतक्या वर्षानंतर हे दोघे प्रमुख प्रथमच एकमेकांविरोधात उभे ठाकले असल्याने कोणाची ताकद अधिक आहे याचा फैसला होणार आहे. एकमेकांशी फटकून असणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील – भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे जुने मित्र या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच आघाडीत सामावले आहेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने हे दोघे एकाच मंचावर येणार का याचेही कुतूहल असणार आहे. बिद्री कारखान्यामध्ये खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर हे सतेज पाटील यांच्या विरोधात होते. आता ही मंडळी आजरा कारखान्यासाठी एकत्रित आली आहेत. परिणामी आजरा कारखान्यासाठी भाजप , कॉंग्रेस व दोनही शिवसेना यांच्या श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादीची श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडी अशी थेट चुरशीची लढत होणार आहे.
हेही वाचा : ४० लाख कार्यकर्ते, ४५ हजार व्हॉट्सअॅप ग्रुप अन् बरंच काही; मध्य प्रदेश जिंकण्यामागे भाजपाची रणनीती काय?
अवजड आर्थिक आव्हाने
आजरा कारखान्याची निवडणुकीत कोणाची सरशी झाली तरी आर्थिक पातळीवर हा कारखाना चालवणे हि कसोटी असणार आहे. या हंगामात उसाची उपलब्धता कमी आहे. पुढील हंगामात याची तीव्रता आणखीनच वाढणार आहे. आजूबाजूला सक्षम कारखान्यांची मालिका उभी आहे. त्यांच्याशी उसाला स्पर्धात्मक दर देणे आणिदुसरीकडे, नाजूक आर्थिक परिस्थिती सांभाळत कारखाना चालवणे हे सत्तेवर येणाऱ्या गटासाठी आव्हानास्पद असणार आहे. शिवाय, सत्ता येवो ना येवो जिल्हा बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची आर्थिक मदतीची भूमिका कशी राहणार यावरही कारखान्याचे भवितव्य असणार आहे. सत्तोत्तर कारखान्याचे आर्थिक सुकाणू हसन मुश्रीफ यांच्याकडे राहण्याचे हे संकेत मानले जात आहे.