कोल्हापूर : केंद्र व राज्याच्या सत्तेत असूनही कोल्हापूर भाजपमधील कार्यकर्त्यांची अस्वस्थता संपता संपत नाही. पालकमंत्री दीपक केसरकर, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांना हटवण्याची मागणी केल्यावर आता कोल्हापूर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखावार हे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निकट असल्याचा आरोप करून अन्य काही मुद्द्यांवरून भाजपने टीका केली आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांनी माजी पालकमंत्र्यांशी संबंध नसल्याचे सांगत माझे कामच कोल्हापूरकर सांगतील, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : मुलीची अश्लील चित्रफित तयार केल्याने खळबळ, महिलेसह १४ आरोपींना अटक

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील हे भाजपचे बडे नेते असतानाही कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कोल्हापूर महापालिकेत सव्वा दोन वर्ष प्रशासक असलेल्या डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मूलभूत प्रश्न सोडवले नाहीत. प्रशासक म्हणून त्या निष्क्रिय असल्याने त्यांची बदली करावी, अशी मागणी भाजपने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एप्रिल महिन्यात केली होती. याच पालकमंत्री दीपक केसरकर यांना अलीकडे भाजपने लक्ष्य केले आहे. केसरकर कोल्हापूरच्या विकासाकडे गांभीर्पूयर्वक लक्ष देत नाहीत. त्यामुळे दीपक केसरकर यांना हटवण्यात यावे, अशी मागणी भाजपने गेल्या महिन्यात केली होती. आता भाजपच्या एका गटाने याच जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर रोखली आहे.

जिल्हाधिकारी आणि वाद

राहुल रेखावार यांना कोल्हापुरात येऊन एक वर्ष, एक महिना झाला. भाजपने जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाज शैलीवर आक्षेप नोंदवला असला तरी ही काही त्यांची पहिली वेळ नव्हे. गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करोना काळातील जिल्हा रुग्णालयातील परिचारकांच्या बदल्या, मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी भाजपचे शिष्टमंडळ रेखावर यांच्या भेटीसाठी गेले. तेव्हा वादाची पहिली सलामी झडली होती. पाच व्यक्तींनीच कार्यालयात यावे अशी अट घालत रेखावर यांनी अकारण गर्दी केल्याबद्दल कार्यकर्त्यांना सुनावले होते. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यावर रेखावार यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘हे कोल्हापूर आहे; इथे असे वागणे चालणार नाही, मंत्र्यांच्या इशारावर काम करू नका,’ असा आरोप केला. जिल्हाधिकाऱ्यांनी हात जोडून निवेदन न स्वीकारताच कार्यालयात येणे पसंत केले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भिंतीवर निवेदन चिकटवले होते. यावेळी छायाचित्रकारांचे कॅमेरे जप्त करण्याचे आदेश दिल्याने रेखावार यांच्या कृतीचा पत्रकारांनीही निषेध नोंदवला होता.

भाजप विरुद्ध रेखावार

आता पुन्हा एकदा भाजपचा एक गट आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात धुमसत आहे. महापालिका प्रशासकांची जून महिन्यात बदली झाल्यापासून त्याचा पदभार आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कार्यभार जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडेच आहे. त्यामुळे या तिन्ही पदावरून रेखावार निभावत असलेल्या कार्यशैली विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपबाजी सुरू केली आहे.

हेही वाचा – उपराजधानीत आणखी एका बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा छडा, तीन दिवसांच्या बाळाची तीन लाखांत विक्री

भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी स्वतःला प्रशासकीय प्रमुख न समजता कोल्हापूरचे मालक समजत आहेत का, असा खडा सवाल केला आहे. महापूर येण्याची शक्यता नसताना रेखावार यांनी भीतीचे वातावरण कोल्हापुरात निर्माण केले. महाद्वार रोडवरील दुकाने, व्यवसाय महापुराच्या कारणासाठी बंद पाडले. जिल्ह्यातील सेतू केंद्राच्या वाटपाबाबत नियम डावलून ठेकेदारांना बेकायदेशीरपणे काम दिले. माजी पालकमंत्र्यांशी एक बैठक झाल्यानंतर गडबडीने हे सारे निर्णय घेवून त्यांना श्रेय मिळवून देण्यासाठी रेखावार यांनी हे जाणीवपूर्वक केले का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महालक्ष्मी मंदिरातील गरुड गेली सहा महिने धार्मिक कृत्यासाठी बंद ठेवला आहे. रेखावर यांच्या अट्टाहासामुळे मंदिरातील वातावरण कलुषित होत आहे, असे आरोप करीत भाजपने रेखावार यांच्यावर शरसंधान केले आहे.

भाजपचे आरोप जिल्हाधिकारी रेखावार यांनी खोडून काढले आहेत. माझ्या निर्णयामध्ये माजी पालकमंत्र्यांची कोणतीही भूमिका नाही. मला ते कोणत्याही सूचना करत नाहीत. पुरातत्व खात्याने नियुक्ती केलेल्या वास्तुविशारदाच्या अंदाजपत्रकानुसार पावसाळ्यानंतर महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे काम सुरू होणार आहे. मनिकर्णिका कुंड, नगारखाना येथेही काम सुरू होणार आहे. महालक्ष्मी मंदिरा लगतच्या वास्तू संपादनासाठी अनेक नागरिकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोबदल्याबाबत काहीजण साशंक असले तरी हे काम निश्चितच लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करीत रेखावार यांनी माझे काम कोल्हापूरकरच सांगतील, असा टोलाही टीकाकारांना लगावला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur bjp is now fighting with the district collector print politics news ssb
Show comments