दयानंद लिपारे
कोल्हापूर : शेजारच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेले दीपक केसरकर यांची पालकमंत्री म्हणून कोल्हापूरची नाळ काही जुळताना दिसत नाही. कोल्हापूरच्या विकासाचा धड एकही प्रश्न सोडवला नसल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात कोल्हापूरकर रोष व्यक्त करीत आहेत. दोन दिवसापूर्वीच ‘कोल्हापूर पालकमंत्री पदावरून दीपक केसरकर यांना हटवावे’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यामुळे पालकमंत्री केसरकर पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
गतवर्षी राज्याच्या राजकारणाचा सारीपाट फिरला. तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली. त्याही वेळी पालकमंत्री कोण होणार यावरून अंतर्गत वादाची कुरबुर होतीच. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील या करवीरपुत्राकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ज्या पुणे जिल्ह्यातून ते निवडून आले आहेत तेथील जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्यावर पाटील समर्थक हिरमुसले होते.
हेही वाचा… नागपूर विद्यापीठात अभाविपची पकड घट्ट
वादग्रस्त पालकमंत्री
केसरकर यांनी पालकमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी विकासाची भलीमोठ्ठी स्वप्ने रंगवली. जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा पर्यटन विकास करण्यापासून ते जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा संकल्प ते प्रत्येक बैठक, चर्चा, कार्यक्रम, शब्दबंबाळ पत्रकार परिषदेत व्यक्त करीत राहिले. कोल्हापूरच्या बहुतांशी प्रश्नांची रखडकथा पाहता केसरकर जिल्ह्याचा द्रुतगतीने विकास करणार अशा अपेक्षा स्वाभाविकपणे वाढल्या. तथापि, पालकमंत्री केसरकर यांची कारकीर्द ही या ना त्या कारणाने वादग्रस्त राहिली.
हेही वाचा… राज ठाकरे यांना सूर तर सापडला…..
कोल्हापूर शहरातील करवीर निवासी महालक्ष्मी मंदिर आणि जुना राजवाडा परिसरातील मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्थलांतर करण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री केसरकर यांच्या विरोधात ओक्टोंबर महिन्यात असंतोष वाढीस लागला. स्थलांतर करण्याच्या मुद्द्यामुळे केसरकर वादाच्या भोवऱ्यात अडकले. या ऐतिहासिक वास्तू मध्ये पंचतारांकित हॉटेल संस्कृती केसरकर यांना सुरू करायची आहे. त्यांचा त्यांचा डाव उधळून लावू, असा ठपका त्यांच्यावर लावून मेन राजाराम हायस्कूल बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाला जोर चढला. परिस्थितीचा नूर लक्षात घेऊन कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन ध्वजवंदनाच्या पूर्वसंध्येला केसरकर यांना ‘मेन राजाराम हायस्कूल ताब्यात घेण्याचा प्रस्ताव विचार नाही’ अशी कबुली देणे भाग पडले. त्यानंतर ते जवळपास प्रत्येक आठवड्याला कोल्हापूरात येऊन विकासाच्या कामांची कामाबाबत बैठका, चर्चा करून प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
हेही वाचा… रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड पुन्हा नाराज?
नव्या वादाच्या कचाट्यात
कोल्हापूर महापालिकेच्या ५० वर्षे रखडलेल्या हद्दवाढ प्रश्नाकडे कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने पालकमंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले. वेळ देवूनही केसरकर काहीच कृती करत नसल्याच्या मुद्द्यावरून हद्दवाढ कृती समिती नाराज होती. एका बैठकीत केसरकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची आश्वासन दिले; पण पुढे काही घडले नाही. यातून कृती समितीचा राग पालकमंत्र्यांवर दिसत आहे. किंबहुना हेच मुद्दे घेऊन त्यांच्या विरोधातील भूमिका अधिक टोकदार केली जात आहे. सर्वपक्षीय समितीने सोमवारी पालकमंत्री हटाव मागणीसाठी आंदोलन केले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रस्त्यावर रोष व्यक्त होवू लागला असताना त्यांचे समर्थन करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच ते एकाकी पडल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर खंडपीठ, पाणी प्रश्न, महापालिका घरफाळा घोटाळा, पंचगंगा, रंकाळा प्रदूषण, महालक्ष्मी मूर्ती संवर्धन, कोल्हापुरी गुळ, चप्पल उद्योगाच्या समस्या याबाबत अनेकदा लक्ष वेधले आहे. तरीही पालकमंत्री दीपक केसरकर हे घोषणाबाजी आणि चर्चेचे गुऱ्हाळ या व्यतिरिक्त काहीही साध्य करू शकले नाही असा निराशाजनक अनुभव आहे. – ॲड. बाबा इंदुलकर, सदस्य कृती समिती, अध्यक्ष कॉमन मॅन संघटना