कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात थोरला भाऊ असलेला काँग्रेस पक्ष वडीलभावाचे नाते टिकवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळच्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. पक्षाचे विधानसभेला चार आणि परिषदेत दोन असे सहा सदस्य असताना विधानसभेला आणखी जागा पदरात पाडून अधिक यश मिळवण्याचा प्रयत्न जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचा आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत तीन जागांवर काँग्रेसला मताधिक्य मिळाले असले तरी आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन पाहता हा आलेख उंचावण्यासाठी काँग्रेसला चांगलेच झटावे लागणार आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले होते. हि कसर गेल्या निवडणुकीत काँग्रेसने भरून काढत चार जागांवर विजय मिळवला. आता काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. राधानगरी मतदार संघात महायुतीची विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित असल्याने येथील माजी आमदार के. पी. पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. बिद्री कारखान्यामध्ये मोठा विजय मिळवला असल्याने विधानसभेची वाटचाल त्यांना सोपी वाटत आहे. शिवाय, या मतदारसंघांमध्ये खासदार शाहू महाराज यांनी ६५ हजाराचे तगडे मताधिक्य घेतले असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी सतेज पाटील यांच्या हालचाली सुरू आहे.
हेही वाचा >>>सूर्यकांता पाटील यांची गाडी अखेर रुळावर आली
करवीर विधानसभा मतदारसंघात लोकसभेला काँग्रेसला सर्वाधिक ७१ हजारहुन मताधिक्य याच मतदारसंघात मिळाले. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी घेतलेले परिश्रम कारणी लागले. यावेळी त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आखाड्यात उतरणार आहेत. दोन वेळा शिवसेनेकडून जिंकलेले चंद्रदीप नरके यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे. येथे पुन्हा एकदा पाटील – नरके घराण्यातली टोकदार लढत पाहायला मिळेल.
तरुणांचे गड आव्हानास्पद
कोल्हापूर उत्तर मध्ये जयश्री जाधव, दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील व हातकणंगले मध्ये राजू आवळे असे काँग्रेसचे तीन आमदार आहेत. आमदार म्हणून त्यांची कामगिरी फारशी उज्वल नसल्याचे चित्र आहे. पहिली निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील यांच्याप्रमाणे राजकीय नेतृत्वाची उंची वाढवू शकले नाहीत. शिवाय, या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीला काँग्रेसला फारसे मताधिक्य मिळालेले नाही. हातकणंगलेत खासदार धैर्यशील माने यांनी १७ हजाराहून अधिक मताधिक्य घेतले आहे. येथे गेल्यावेळी पराभूत झालेले अशोक माने झपाटून कामाला लागल्याने राजू आवळे यांचा मार्ग सोपा असणार नाही. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निसटते साडेसहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. येथे पुन्हा एकदा ऋतुराज पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक अशी लढत अशी चुरशीची लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा >>>बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शाहू महाराज यांना साडे चौदा हजाराचे मताधिक्य मिळाले होते. येथे आमदार जयश्री जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार की नवा चेहरा आणला जाणार याची उत्सुकता असणार आहे. येथे महायुतीकडून उमेदवारीचे अनेक दावेदार असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार यावर निकालाचे समीकरण अवलंबून असणार आहे.
गेल्यावेळी सतेज पाटील हे संजय मंडलिक यांच्या बाजूने राहिल्याने भरघोस यश मिळाले होते. यावेळी त्यांनी नेटकी यंत्रणा राबवून दीड लाखाचे मताधिक्य घेण्यात मोलाची जबाबदारी निभावली होती. तर आता विधानसभेला पूर्वीच्या जागा जिंकून आणखी एक जागा मिळवून चांगल्या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्याच्या हालचाली दिसत आहेत.