कोल्हापूर : सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ प्रकल्प नेण्याचा इरादा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त करीत प्रकल्पाचे वातावरण तापले असताना बाजू घेण्याची धाडशी भूमिका मांडली खरी. त्यावर क्षीरसागर हे शहरातील लोकप्रतिनिधी आहेत. ग्रामीण भागाचा याला विरोधच राहील, अशी बोचरी टिपणी करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. याबाबत आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. या निमित्ताने कोल्हापुरातून शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील महायुतीतील बड्या नेत्यातील मतभेद समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शक्तिपीठ महामार्गाला बागायती शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. याचे राजकीय फटके महायुतीला लोकसभेवेळी बसले होते. या मार्गावरील महायुतीचे अनेक उमेदवारांना पराभूत व्हावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी याचे पुन्हा परिणाम दिसणार असे जाणवू लागल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना तातडीने काढण्यात आली. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात सर्व दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग साकारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरातून हा प्रकल्प जाणार की नाही असा मुद्दा तापताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुर जिल्ह्यात बोलताना शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही, असे विधान केले होते. मात्र काल एका चर्चासत्रावेळी त्यांचे कट्टर समर्थक, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गास असणारी विरोधाची कारणे जाणून घेतली जातील. जनमानसात असणारे गैरसमज दूर करण्यात येतील. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग साकारण्यात येईल, असे मत व्यक्त करून हा प्रकल्प जिल्ह्यातून पुढे नेण्याचे संकेत दिले.

जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडी अशा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शक्तिपीठ विरोधात भूमिका घेतली असताना एकट्या क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाला बळ दिले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका एकांगी ठरणार की महायुतीकडून आणखी काही नेते पुढे येणार यालाही महत्त्व आले आहे. या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी क्षीरसागर हे शहरी भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. ग्रामीण भागाचा त्याला विरोधच आहे. शक्तिपीठ प्रकल्पाची भूमी संपादन रद्द करण्याची अधिसूचना जिल्ह्यात अजूनही कायम आहे. या प्रकल्पामुळे लोकसभा निवडणुकीला महायुतीला राजकीय किंमत मोजावी लागले होती. आजही या प्रकल्पास विरोध कायम आहे, असे म्हणत आपली मूळ भूमिका कायम ठेवली आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर प्रकाश आबिटकर यांनीही शक्तीपीठ महामार्गास विरोध दर्शवला होता. मुश्रीफ – क्षीरसागर यांच्यातील मतभेदाची भूमिका पुढे येत असताना आबिटकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेते कोणती भूमिका घेतात, शक्तिपीठ प्रकल्पाला जिल्ह्यातून राजकीय बळ मिळणार का, कि विरोधाचे नारे कायम राहणार यावरून राजकीय संघर्ष पाहायला मिळेल असे दिसत आहे.