दयानंद लिपारे
कोल्हापूर : निष्ठावंत शिवसैनिकांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याच्या मागणीने कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना गटाच्या मेळाव्यात शिवसैनिकांत उत्साह संचारला. आजवर शिवसेनेच्या उमेदवारीचा उपयोग निवडणुकीपुरता करायचा आणि पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करायचे असाच जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमी शिवसैनिकांना उमेदवारी देण्याची मागणी रास्त असली तरी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या सक्षम चेहऱ्याचा अभाव ही सर्वात मोठी समस्या आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून यावा असे स्वप्न पाहिले होते. पण प्रत्येक लोकसभा निवडणुकी वेळी शिवसेना नव्या उमेदवाराचा प्रयोग हे सूत्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही राहिले. तथापि शिवसेनेची उमेदवारी दिली ते निकाल लागताच बाजूला जात राहिले. परिणामी निष्ठावंत शिवसैनिकांना पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याची वेळ येत राहिली. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात सलग दोनदा एकदाही शिवसेनेचा उमेदवार उभा राहू शकला नाही; ते याच धडसोड वृत्तीमुळे.
हेही वाचा… बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरमध्ये भाजप नेत्यांची कोंडी
कोल्हापुरात उपरे
कोल्हापूर मतदार संघात १९९१ साली शिवसेनेने तत्कालीन जिल्हाप्रमुख रामभाऊ फाळके यांची पहिली उमेदवारी अपयशी ठरली. त्यानंतर कायमच शिवसेनेला उपऱ्या उमेदवारावर अवलंबून राहावे लागले. १९९६ साली अभिनेता रमेश देव यांच्या रूपाने तारांकित उमेदवारी दिली पण तेही पराभूत झाले. यानंतरच्या पुढील सलग चार निवडणुकांमध्ये सदाशिवराव मंडलिक यांचा विजय होत गेला. त्यांच्या विरोधात शिवसेनेने प्रथम १९९८ साली विक्रमसिंह घाटगे यांनाआखाड्यात उतरवले तेव्हा त्यांनी अखेरपर्यंत पक्ष सोडणार नाही असा निर्धार केला. पराभवानंतर सहा महिन्यातच ते काँग्रेसवाशी झाले. पुढील निवडणुकीत कोकणातील मेजर शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक असे प्रयोग केले २००९ साली जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना उमेदवारी दिली. पुढच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना आयात केले पण ते महाडिक यांच्याकडून पराभूत झाले. गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच संजय मंडलिक यांच्या रूपाने यश मिळत असताना त्यांनी महाडिक यांच्यावर मात केली. आता मंडलिक शिंदे यांच्या छावणीत दाखल झाल्याने ठाकरे सेनेला उमेदवारीचा शोध आहे.
हेही वाचा… फाटाफुटीच्या राजकारणात अकोल्यात राष्ट्रवादीची वाट बिकट
हातकणंगलेही तोच कित्ता
पूर्वीच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने १९९८ साली निवेदिता माने यांच्या रूपाने दिलेली पहिली उमेदवारी यशस्वी झाली नाही. पुढील निवडणुकी वेळी शिवसेनेने तत्कालीन जिल्हाप्रमुख पुंडलिक जाधव यांना उमेदवारी दिली पण त्यांची मते एक लाख इतकीच राहिली. २००४ मध्ये संजय पाटील यांना तर २००९ मध्ये रघुनाथदादा पाटील असे आयात चेहरे शिवसेनेने अनुभवून पहिले. गेल्या वेळी धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवताना राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. माने सध्या शिंदे समर्थक आहेत.
हेही वाचा… सोलापुरात पर्यायी नेतृत्व उभे करण्याचे शरद पवारांपुढे आव्हान
शिवसैनिकांची ताकद किती ?
आता हातकणंगलेत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे इच्छुक आहेत. याच जाधव यांनी २०१४ साली इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवली असता अवघी ५ हजार मते मिळाली होती. हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता.. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाईंना श्वेता अभिषेक देवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सच्चा शिवसैनिक म्हणून गेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती.विजय समीप दिसत असताना राजकीय चित्र बदलले आणि त्यांचा पराभव होऊन कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे भाजपकडून विजयी झाले. हेच पवार एकदा महापालिका निवडणुकीत विजय होऊन स्थायी समिती सभापती झाले.त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली जात असली तरी त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुका आणि त्यामध्ये मिळालेला मतांची आकडेवारी उत्साहवर्धक असल्याचे चित्र दिसत नाही. जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती बरी असल्याने महाविकास आघाडीच्या जोरावर खासदार होण्याची संधी शोधली जाताना दिसत आहे. सरतेशेवटी इच्छुकांची निवडून येण्याची ताकद कितपत आहे याचाही विचार मातोश्रीवर केला जाणार यात संदेह नाही.