कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये शह – काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम ठेवली आहे. आता तर थेट मंडलिक यांची उमेदवारी अडचणीची ठरणार असे म्हणत त्यांच्या उमेदवारीला भाजपमधून जाहीरपणे विरोध केला जात आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागल्यानंतर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगणारे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्यावरच सारवासारव करण्याची वेळ आली आहे. महायुतीतील तणाव अधिकच वाढीस लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर मतदार संघात आधीच्या दोन लढती या संजय मंडलिक – धनंजय महाडिक यांच्यात प्रत्येकी एक विजय एक पराभव अशा बरोबरीत सुटल्या आहेत. यावेळी या आखाड्यात महायुतीकडून उतरण्याची तयारी दोघांनीही केली आहे. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध लपून राहिलेला नाही. अलीकडेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी तशी मागणी उघडपणे करण्यात आली.

हेही वाचा : पक्षाअंतर्गत विरोधकांशी संवाद साधण्याची विखे-पाटील यांना गरज का भासली ?

भाजपाची प्रबळ दावेदारी

वर्षभरापूर्वी राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला असला तरी त्यांना लोकसभेचे वेध लागले असून पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवू असे म्हणत आहेत. शिवाय, अरुंधती धनंजय महाडिक, शौमिका अमल महाडिक ही नावे त्यांच्याकडून पुढे आणली जात आहेत. स्पर्धेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचेही नाव असले तरी त्यांचा जीव कागल विधानसभा मतदारसंघात गुंतला आहे. या पद्धतीने भाजपचा आडून आडून असेना वेळोवेळी दावा सुरु राहिला.

हेही वाचा : नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

मंडलिकांना भाजपचा शह

संजय मंडलिक हे आपणच उमेदवार असणार हे छातीठोकपणे सांगात आहेत. शाहू महाराज यांच्या विरोधात लढण्याचे गृहीत धरून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इकडे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात वेगळाच राजकीय रंग भरला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, विधानसभेचे अध्यक्ष बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने आधी शिवसेना आणि वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. गडहिंग्लज तालुक्यातील भाजपच्या मेळाव्यात कुपेकर यांनी मंडलिक यांचे वाभाडे काढले. संजय मंडलिक यांचा मतदारसंघात संपर्क नाही. उद्या वेगळे चित्र दिसले तर त्याचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडले जाईल. मागील वेळी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला नाही ही मोठी चूक झाली. मंडलिक यांना उमेदवारी दिली तर प्रचार करणार नाही. लोकांना कितीही सांगितले तरी ते मते देणार नाहीत. भाजपच्या चिन्हावर लढणारा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा, असे टोकाचे विधान कुपेकर यांनी केल्याने महायुतीतील वाद उफाळला आहे.

हेही वाचा : साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक

मंडलिक संघर्षाच्या तयारीत

कुपेकर हे महाडिक यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मंडलिक यांच्या छावणीतून या विधानाचे कर्तेकरविते कोण याची संगती लावली जात आहे. या विधानावरून महायुती मधील तणाव वाढीस लागला असून त्याचे पडसाद ‘वर्षा’ पर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. ठिणगीची ज्वाळा होण्यापूर्वीच नेते सावध झाले आहेत. लगेचच खासदार धनंजय महाडिक यांना महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नयेत. मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. भाजपचा या मतदारसंघावर दावा नाही, अशी मखलाशी करावी लागत आहे. टीका जिव्हारी लागल्याने मंडलिक यांनी कुपेकर यांच्यावर पलटवार केला आहे. मित्र असलेले संग्रामसिंह कुपेकर नेहमी भेटतात. पण विकास कामाबद्दल त्यांनी कधीच वाच्यता केलेली नाही. त्यांच्या शेतातील रस्ता मीच केला आहे. माझ्या विकास कामांची माहिती घेतली असती तर त्यांचे गैरसमज दूर झाले असते, असा टोला लगावला आहे. उमेदवारीबाबत अनिश्चितता असली तरी मंडलिक हे काही झाले तरी निवडणूक लढवणार हे नक्की. उमेदवारीवरून दावे – प्रतिदावे, टीकाटिपणी सुरु असली तरी निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील महायुतीतील तणाव निकालावर परिणाम करणारा ठरू शकतो याचे भान उरले नसल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur lok sabha election shinde shivsena mp sanjay mandlik vs bjp dhananjay mahadik print politics news css
Show comments