दयानंद लिपारे
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गटातील अस्तित्वाचा सामना कोल्हापुरात सुरू झाला आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रमुख नेते हसन मुश्रीफ अजितदादा गटात गेल्यामुळे हा गट बळकट दिसत आहे. निष्ठावंताची मोट बांधून शरद पवार यांना ताकद देण्यासाठी एक गट सज्ज झाला आहे. राजकारणासाठी अत्यावश्यक साधन सामुग्री, नियोजन, कार्यकर्त्यांचे बळ या बाबींमध्ये असमानता असताना दोघांमध्ये अधिक ताकद कोणाची याची राजकीय स्पर्धा असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेसच्या प्रभावाला शह देत राष्ट्रवादीचा विस्तार होत राहिला. दोन खासदार, पाच आमदार, तीन मंत्री अशी एकाच वेळी दणकट स्थिती पाहायला मिळत होती. सदाशिवराव मंडलिक, बाबा कुपेकर, दिग्विजय खानविलकर या दिवंगत नेत्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात हसन मुश्रीफ हेच सर्वेसर्वा बनले. मुश्रीफ वगळता राष्ट्रवादीचे राजकारण करणे अशक्य व्हावे अशी स्थिती निर्माण झाली. तरीही दोन-तीन तालुके वगळता राष्ट्रवादीचा प्रभाव करणे त्यांनाही शक्य झाले नाही.
हेही वाचा… नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलली, सुजय विखे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण ?
अजितदादांना पाठबळ
आता मुश्रीफ आणि चंदगडचे राजेश पाटील असे दोनच आमदार उरले असले तरी त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचे ठरवले आहे. माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी सत्काराच्या निमित्ताने भेट घेवून संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात समर्थक त्यांच्यासोबत राहिले आहेत. मंत्री म्हणून कोल्हापुरात आल्यानंतर मुश्रीफ यांनी जुने काही सहकारी सोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला असल्याने निष्ठावान गटाला हादरा बसणार का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार गटाची ताकद जिल्ह्यात वाढवण्याचा इरादा मुश्रीफ यांनी तर आगामी विधानसभा निवडणुकीत चार ते पाच आमदार निवडून आणण्याचा संकल्प आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदींनी व्यक्त केला. सत्तेतील एकनाथ शिंदे शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षातील वाटप दहा जागांमध्ये होणार असल्याने मुळात मतदार संघ पदरात पडणार किती आणि निवडून येणार किती, हा प्रश्न उरतोच. हे आव्हान नेता या नात्याने मुश्रीफ यांच्यासमोर असणार आहे.
हेही वाचा… विधान परिषद बंडखोरांवर कारवाईसाठी पुन्हा न्यायालयीन लढाईचाच मार्ग?
मुश्रीफांकडून अपेक्षा
मुश्रीफ यांना ग्रामविकास विभागाचे खाते अपेक्षित होते; पण मिळाले दुसरेच. वैद्यकीय शिक्षण मंत्री पद मिळाल्याने मुश्रीफ यांनी जिल्हा रुग्णालय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) व अन्य रुग्णालयांना अद्यावत सुविधा उपलब्ध करण्याचा आश्वासन दिले आहे. वैद्यकीय सुविधा आणि संजय गांधी निराधार या दोन्ही योजना त्यांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणे हा त्यांच्यासाठी कामाचाच नाही तर आनंदाचाही भाग असल्याने कोल्हापूरकरांना याबाबतीत किमान काही अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
हेही वाचा… भारत राष्ट्र समिती हातपाय पसरू लागली
पवार गट सक्रिय
कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गटाची बांधणी करणे हे उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस समोर आव्हान असणार आहे. उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी जिल्ह्याचा तालुका निहाय संपर्क सुरू केला आहे. मुश्रीफ यांच्या विधानसभेच्या भागात जावून त्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. शरद पवार यांनी आमदार अनेकदा आमदार, मंत्री पदाची संधी देऊनही त्याचा मुश्रीफ यांना विसर पडला आहे,अशी टीका माजी आमदार राजू आवळे यांनी केली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे, मदन कारंडे,अमर चव्हाण आदींनी शरद निष्ठेला महत्त्व दिले आहे. अजित पवार गटाकडे मंत्रिपद, आमदार, संस्थात्मक ताकद असे बरेच काही आहे. तुलनेने मोजके लोक वगळता शरद निष्ठ याबाबत साधनसामग्रीने अपुरे असल्याने असमान स्थितीत अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागणार असे दिसत आहे. शरदनिष्ठ गटाकडून टीकेच्या तोफा सुरू असल्या तरी मुश्रीफ यांनी मात्र त्यांच्या समर्थकांना दुसऱ्या गटावर टीका करू नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे एकीकडे टीकेच्या तोफखाना आणि दुसरीकडे टिका न करता पक्ष कार्य वाढवण्याची भूमिका अशा दोन प्रवाहातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी दोन गटाचा संघर्ष सुरू झाला आहे.