कोल्हापूर : ऊस पट्ट्यात ऊस दर आंदोलनाची सांगता झाली असताना आता लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी आधीच दंड थोपटले आहेत. आता शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्याशीही सामना करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रतीक पाटील मैदान उतरले तरी काहीच फरक पडणार नाही असे म्हणत शेट्टी यांनी जयंत पाटील यांना ललकारले आहे. दुसरीकडे शेट्टी यांच्या ऊस आंदोलनात तडजोड करण्याच्या भूमिकेवरून त्यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी टीकेची तोफ डागल्याने जुन्या दोन मित्रातील वादाला नव्याने फोडणी मिळाली असली तरी एकाचवेळी अनेकांना अंगावर घेण्याचे शेट्टी यांचे डावपेच चर्चेत आहेत.
गेले महिनाभर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा फड पेटला होता. साखर कारखान्यांचे गाळप थांबल्याने आर्थिक परिणाम जाणवू लागले होते. ऊस दरामध्ये तडजोड करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतला. आता हे आंदोलन थांबले आहे. यानंतर शेट्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी दौरा सुरू केला आहे. राजू शेट्टी यांनी पहिलीच भेट सांगली जिल्ह्याला दिली. साहजिकच लोकसभा निवडणुकीचा विषय निघाला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतीक पाटील या दोघांच्याही नावाची चर्चा पक्षांतर्गत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा : विधानपरिषदेतील दोन शिवसेना आमदारांची अपात्रतेचा धोक्यातून सुटका?
हातकणंगले मतदारसंघातील कोल्हापुरातील चारही तालुक्यात प्रतीक पाटील यांच्या नावाला पसंती आहे, अशी जमेची बाजू मांडताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात येऊ नये,असाही आग्रह धरला होता. दुसरीकडे, इंडिया – महाविकास आघाडी अंतर्गत राजकारणात राजू शेट्टी यांना मतदार संघ सोडण्याची हालचाली आहेत. शेट्टी यांनी मात्र एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे. हीच भूमिका त्यांनी अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच ऊस दर आंदोलन संपल्यावर शेट्टी यांनी सांगलीत जाऊन प्रतीक पाटील यांच्यामुळे मला कसलाही फरक पडणार नाही. माझा मतदारसंघ ठरलेला आहे. माझ्या विरोधात कोण असणार याच्याशी काही देणे घेणे नाही.प्रतीक पाटील किंवा सध्याचे खासदार यांची मला चिंता वाटत नाही.जनता माझ्यासोबत असल्याने मला खात्री आहे, असे ठामपणे विधान केले आहे. मागील निवडणुकीवेळी साखर कारखानदारांशी केलेली सलगी शेट्टी यांच्या खासदारकीच्या वाटेतील धोंड बनली होती. हि बाब लक्षात घेऊन आगामी निवडणुकीत प्रतीक यांच्या रूपाने साखर कारखानदार समोर उभा ठाकणार असेल तर मुकाबला करण्यास चांगला वाव असणार आहे असा तर्क शेट्टी गोटात मांडला जात आहे. त्यामुळे शेट्टी यांनी खासदार माने आणि प्रतीक पाटील यांच्याशी आखाड्यात कुस्ती धरण्याची तयारी दाखवली असल्याने या मतदारसंघात तगडी तिरंगी लढत होणार असे संकेत मिळत लागले आहेत.
हेही वाचा : तेलंगणात काँग्रेस की चंद्रशेखर राव सत्ता राखणार ?
शेट्टी – खोत वाद उफाळला
ऊस दर आंदोलन सुरू असताना त्याला लोकसभा निवडणुकीचे किनारही दिसून आली. राजू शेट्टी यांनी हे आंदोलन अधिकच तापवले. राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकरी आंदोलनात उतरल्याने शेट्टी यांचा हुरूप वाढल्याचे दिसतो. त्यामुळे आता त्यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या द्राक्ष, बेदाणे आंदोलनात उतरण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघातील वाळवा – शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. शेट्टी यांच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांचे कट्टर स्पर्धक माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी शह देण्यासाठी पावले टाकली आहेत. खोत यांनी इचलकरंजीत येऊन आगामी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा उमेदवार विजयी होईल असा उल्लेख करीत निवडणुकीला मराठा समाजाचे प्राबल्य राहील, हे सुचित करत शेट्टी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती चालवली आहे. खोत यांनी ऊस दरात तडजोड करून शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ८० कोटी मिळवून दिले पण शेतकऱ्यांचे २५० कोटी रुपये बुडवले. आंदोलनातून गुलालात न्हाहून निघण्याच्या प्रकाराला लोकसभा निवडणुकीचा वास आहे. शेतकरी हा प्रयत्न यशस्वी होऊ न देता बहुजन समाजाला विजयी करतील, असे म्हणत विरोधकांची जातीय- धार्मिक रणनीती स्पष्ट केली आहे. शेट्टी यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या एका आंदोलनात १५ हजार लोक उतरले हेच माझ्या प्रतिसादाचे प्रमाणपत्र आहे. कोणा लुंग्या सुंग्याच्या प्रमाणपत्राची त्यासाठी गरज नाही. खोत यांना उत्तर द्यायला सांगलीचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे पुरेसे आहेत.किंबहुना खराडे हे सुद्धा खोत यांच्यापेक्षा काहीसे उंच आहेत, असे म्हणत शेट्टी यांनी आपल्या जुन्या मित्राला बेदखल ठरवले आहे. तथापि लोकसभा निवडणुकीच्या हालचाली पाहता शेट्टी -खोत यांच्यातील शाब्दिक चकमकी वाढतच राहणार हेही स्पष्ट होत आहे.