कोल्हापूर : राजकारणामध्ये आजोबा – पणजोबा यांचा वारसा चालवणारे सक्रिय असल्याचे दिसतात. कोल्हापूरच्या बाबतीत मात्र वेगळी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी श्रीमंत शाहू महाराज हे महाविकास आघाडी कडून रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले असले तरी करवीरच्या या छत्रपती घराण्यातील युवराज संभाजी राजे व युवराज मालोजीराजे यांना आधी सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. यानंतर आता छत्रपती संसदेत जाणार का याकडे लक्ष वेधले आहे. वरून खाली येणारा झिरपणीचा सिद्धांत प्रचलित असला तरी कोल्हापुरात राजकारणातील वरचणीचा नवा सिद्धांत दिसून येत आहे.
राजकारण आणि घराणेशाही याची नेहमी चर्चा होत असते. छत्रपती घराण्यात पूर्वापार परंपरेने गादी चालवण्याचा मान मिळत आला आहे. वारणेचा तह झाल्यानंतर साताऱ्याची थोरली पाती आणि कोल्हापूरची धाकटी पाती अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. स्वातंत्रानंतर दोन्ही पातीचे वारसदार सातारा व कोल्हापूर येथे सक्रिय राहिले आहेत. प्रतापसिंह राजे साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यांचा राजकीय वारसा कल्पना राजे आणि उदयनराजे यांनी चालवला. तर, तेथील दुसरा प्रवाह अभयसिंहराजे भोसले यांच्या रूपाने पुढे जात राहिला. शरद पवार यांच्या मदतीने ते राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवेंद्रराजे भोसले हे त्यांचा वारसा चालवत आहेत.
हेही वाचा : मराठवाड्यात मुस्लिम व मराठा मतेपढीला आकार
आमदार आणि खासदारकी
आधीच्या पिढीचा वारसा पुढची पिढी चालवत असल्याचे राजकारणात पदोपदी दिसत असते. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या बाबतीत वेगळे चित्र दिसत आहे. येथे राजकारणाचा प्रवाह हा खालच्या थराकडून वरच्या थराकडे जाताना दिसत आहे. सर्वप्रथम धाकटे युवराज मालोजी राजे छत्रपती हे २००४ साली कोल्हापुरातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर राष्ट्रपती कोट्यातून थोरले युवराज संभाजी राजे यांना सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीतून संसदेत पाठवण्यात आले. याद्वारे भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला शह दिल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. म्हणजे आधी धाकटे युवराज विधानसभेत तर नंतर थोरले युवराज राज्यसभेत पोहचले.
हेही वाचा : Loksabha Election 2024 : आयारामांना संधी दिल्यामुळे सपात नाराजीनाट्य; पक्षांतर्गत असंतोष वाढणार?
तर दोन पिढ्या संसदेत
तर आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडी कडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी संभाजी राजे व मालोजीराजे या युवराजांसह तिसरी पिढीही कार्यरत झाली आहे. या निमित्ताने श्रीमंत शाहू महाराज हे राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी ठरले तर संभाजीराजे यांच्याप्रमाणे संसदेत जाणारे तेकोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील दुसरी व्यक्ती ठरणार आहेत. छत्रपती घराण्यातील हा राजकीय प्रवाह असा खालून वर कडे जाणारा असल्याने त्याचे वेगळेपण अधोरेखित होत आहे.