कोल्हापूर : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार स्वबळावर सुरू केला असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार उभा केला नाही तर त्याचे स्वागत करतो, असे म्हणत एका अर्थाने माविआ सोबतच्या सहकार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची लढत निश्चित मानली जात असताना भाजपच्या गोटातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक या उमेदवारांची नावे पर्याय म्हणून नव्याने पुढे येऊ लागली असल्याने या पातळीवरचा संभ्रम संपताना दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची यावेळची लढत चुरशीची होणार हे दिसू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणूक शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी प्रथमच निवडणूक रिंगणात उतरताना राजू शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. शेट्टी यांच्या संसद ते शिवार या प्रवासाची हॅट्रिक खंडित करीत माने प्रथमच संसदेत पोहोचले. आता या दोघांमध्येच पुन्हा लोकसभा निवडणुकीचे समर रंगणार हे बरेचसे स्पष्ट झाले आहे. मात्र अखेरच्या टप्प्यांमध्ये राजकीय पातळीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्यामुळे रागरंग बदलण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपड, भाजपमध्ये धाकधूक

शेट्टींची लवचिकता

गेले काही महिने राजू शेट्टी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता निवडणूक लढवणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. स्वाभिमानी पक्षाने राज्यात आठ ठिकाणी उमेदवार असतील असे सांगून टाकत ताठर भूमिका घेतली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यापासून अनेक जण महाविकास आघाडीकडून शेट्टी हे मविआचे उमेदवार असतील अशी भूमिका मांडताना दिसत होते. त्यांच्या या भूमिकेला शेट्टी यांच्याकडून थंडा प्रतिसाद मिळत होता. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी गेले महिन्याभर शेट्टी यांच्याशी संवाद खंडित केल्याचे सांगितले जाते. इंडिया – माविआच्या चर्चेमध्ये हातकणंगले मतदारसंघ शेट्टी यांच्यासाठी सोडला जाणार असल्याचे वृत्त आहे. पण शेट्टी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसतात. गेल्यावेळी ते आघाडीचे उमेदवार होते. तेव्हा साखर कारखानदारांसोबत ते एकाच मंचावर आल्याने त्याचा फटका बसला होता. ही चूक यावेळी टाळण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यातूनच एकला चलो रे असे म्हणत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तथापि, सोमवारी माध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी माझ्या विरोधात उमेदवारी द्यायचा की नाही हे माविआने ठरवावे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता म्हणून माझ्या विरोधात ते उमेदवार उभा करणार नसतील तर मी त्याचे स्वागत करतो, असे म्हणत त्यांनी एका अर्थाने माविआ सोबत मैत्रीला होकार भरल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : अमरावतीत अडसुळांच्या दाव्‍याने महायुतीत पेचप्रसंग

महायुतीत संभ्रम

शिंदे सेनेकडून धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरत असताना पुन्हा भाजपच्या हालचाली लक्षवेधी ठरत आहेत. भाजप अंतर्गत सर्व्हेच्या आधारे उमेदवार बदलला जावा अशी मागणी पक्षीय पातळीवर जोरदारपणे रेटली जात आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका अमल महाडिक,पन्हाळा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे ही नावे पुढे येऊ लागली आहेत. यापूर्वी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे पुत्र राहुल आवाडे, पूर्वी शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले भाजपचे मयूर संघाचे संजय पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश पाटील अशी काही ठळक नावेही उमेदवारीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीची माळ अखेरीस कोणाच्या गळ्यात पडणार याचा संभ्रम वाढत आहे.