कोल्हापूर : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर पश्चिम महाराष्ट्रातील गडहिंग्लज हा पक्षाचा एकमेव गड टिकवणे हे पक्षासमोर आव्हान असणार आहे. त्यांच्या कन्या, दोन वेळेच्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष स्वाती कोरी यांना ताकत देण्याचा निर्धार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याचवेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. शिंदे कुटुंबीयांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटचे संबंध असल्याने विधानसभा निवडणुकीला काही नवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गडहिंग्लज तालुक्यामध्ये श्रीपतराव शिंदे यांनी जनता दलाचा गड चार दशकाहून अधिक काळ टिकवून धरला. विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष झाला. गडहिंग्लज नगरपालिका, साखर कारखाना येथेही शिंदे यांनी दीर्घकाळ जनता दलाचा झेंडा लावत पक्षाकडे महत्त्वाचे सत्ता स्थान ठेवण्यात ते यशस्वी झाले. शेतकरी, उपेक्षित यांच्यासाठी लढणारे शिंदे हे परखड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.अलीकडच्या काळात जनता दलाकडे निवडून येण्याची क्षमता नसली तरी या गटाचे उपद्रव मूल्य कायम राहिले. कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे ठरवण्या इतकी ताकद शिंदे गटाकडे कायम राहिली. त्यामुळे शिंदे वजा दोन तालुक्यात राजकारणाचे समीकरण जुळवणे कठीण झाले. त्यांच्या कन्या स्वाती कोरी या दोनदा (एकदा थेट नगराध्यक्ष निवडणुकीत) नगराध्यक्ष झाल्या. आगामी राजकारणात कागल विधानसभा मतदारसंघातील कोरी यांचे राजकीय निर्णय उलटफेर घडवण्यास पुरेशे ठरू शकतात.
हेही वाचा : कृष्णाकाठच्या पाण्यावरून सातारा विरुद्ध सांगली अशी राजकीय दरी
भाजपचा गळ
भाजपने शिंदे यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न केले होते. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील असताना त्यांनी श्रीपतराव शिंदे यांना भाजपात येण्याचे उघडपणे निमंत्रण दिले होते. ते येणार नसेल तर किमान स्वाती कोरी यांना तरी भाजपात पाठवावे,अशी विनवणी केली होती. धर्मनिरपेक्षतेच्या विचारांची कास धरलेले शिंदे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्या वेळचे थांबलेले भाजपचे प्रयत्न पुन्हा नव्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा : यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्यात पुन्हा एकदा संघर्ष
गडहिंग्लज हा कागल विधानसभा मतदारसंघाची जोडला गेलेला भाग आहे. शिंदे यांच्याशी कधी जुळवून घेणारे इतर कधी त्यांच्याशी सामना करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज मध्ये गटाची फेरबांधणी चालवली आहे. त्यांच्याकडून शिंदे गटाचे काही प्रमुख आपल्या गोटात घेण्याचे प्रयत्न राहण्याची चिन्हे आहेत. तसेच भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेही शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या काही सहकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करण्याची पुढील काळात करण्याची शक्यता दिसत आहे. तथापि गडहिंग्लज नगरपालिका आणि साखर कारखान्याचे राजकारण याची संगती घालत शिंदे यांच्या पश्चात स्वाती कोरी सावधपणे धोरणी निर्णय घेणार असे दिसते. त्यांच्या निर्णयालाही अनन्य साधारण महत्त्व आहे.
हेही वाचा : ‘निवडणूक शिवराज चौहानांची नव्हे, बुधनीच्या जनतेची!’
श्रीपतराव शिंदे यांचे शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध होते. त्यामुळे शरद पवार हेही गडहिंग्लजच्या पर्यायाने कागलच्या राजकारणात अधिक गंभीरपणे लक्ष घालतील असे दिसत आहे. श्रीपतराव शिंदे यांच्यासारखे दमदार नेतृत्व हरपल्यानंतर स्वाती कोरी यांना राजकारणाच्या बदलत्या काळात एकट्याच्या खांद्यावर पक्षाचे राजकारण करणे हेही सोपे असणार नाही. श्रीपतराव शिंदे यांचा संघर्षाचा वारसा जपत गडहिंग्लज मध्ये मोर्चा काढून जनसामान्यानाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत अनोखी श्रद्धांजली वाहिली. याचेवेळी त्यांनी स्वाती कोरी यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे.अशाच वेळी गट फोडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने सावध हालचाली कराव्या लागणार आहेत. अशा नव्या फेर मांडणी गड जनता दलाचा गड टिकवणे हे कोरी यांच्यासह श्रीपतराव शिंदे यांच्या अनुयायांसमोर यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.