दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : महिना संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा रविवारी कोल्हापुरात येत असताना परिस्थिती आणि घटनाक्रमांमध्ये बराच बदल घडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्काराची ‘उत्तरदायित्व सभा’ विक्रमी करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियोजनाचा धडाका लावला आहे. शरद पवार यांच्या सभेपेक्षा ही सभा मोठी करण्याची चंगच मुश्रीफ यांनी बांधला आहे. ‘पाच हजारांच्या सभेला ५०हजारांचे उत्तर’, असे संदेश मुश्रीफ यांच्या गटाकडून दिले जात आहेत.

राज्यात फेरपालट होऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वातंत्र्यदिनी प्रथमच कोल्हापूरात आले होते. तेव्हा अजित पवार गटाला त्यांचे मनासारखे स्वागत करता आले नव्हते. या वेळी मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाणार असले तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापदायक ठरू शकतो. माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह इचलकरंजी महापालिकेत बेरजेचे राजकारण करण्यात मुश्रीफ यांना यश आले आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण प्रश्नावरून मागील दौऱ्यात समाजाला आश्वस्त केलेले उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात विरोधक तसेच ठाकरे सेनेकडून विरोधाचे नारे सुरू झाले असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून पडसाद उमटत आहेत.

हेही वाचा… विदर्भातील दोन प्रदेशाध्यक्षांच्या ‘नाना तऱ्हा’

काकांना प्रत्युत्तर?

या अंतर्गत काका शरद पवार यांची पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात सभा झाल्यानंतर आता पुतण्या अजित पवार यांचीही सभा होत आहे. मात्र ही सभा शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी नसल्याचे सांगितले जात आहे. ‘ राष्ट्रवादी काँग्रेसची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील ‘उत्तरदायित्व’ सभा ही ईर्षेसाठी होत नाही, तर जनतेला विकास कामांचे ‘उत्तरदायित्व’ देण्यासाठी आयोजित केली आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. तरीही अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून त्यांच्यावर कोल्हापुरात झालेल्या जहाल टिकेबद्दल काय बोलणार याची उत्सुकता आहेच.

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलनामुळे भाजप पक्षश्रेष्ठींना चिंता

मुश्रीफांचे शक्तिप्रदर्शन

अजित पवार यांची ही सभा दणक्यात व्हावी यासाठी मुश्रीफ यांनी नियोजनाचा धडाका लावला आहे. याआधी मुश्रीफ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असताना त्यांच्या सभा, कार्यक्रमाचे ताकदीने नियोजन करत असत. आता ते अजितदादांच्या जवळ गेल्याने त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनातून शक्तीप्रदर्शनाची तयारी चालवली आहे.’ ५ हजाराच्या सभेला ५० हजाराचे उत्तर ‘ असे चिमटे कोल्हापुरात अजितदादा गटाकडून सुरुवातीला काढले जात होते. आता ही सभा लाखाच्या गर्दीची करण्यासाठी मुश्रीफ यांनी कंबर कसली असून त्यांनी तालुकानिहाय बैठकांचा धडाका लावला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनीही शरद पवार की अजितदादा हा संभ्रम दूर करीत आपण अजित पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने जिल्ह्यात मुश्रीफ गटाला बळ मिळाले आहे. इचलकरंजी महापालिकेतील एक गट पक्षात आणून तोळामासा अवस्था असलेल्या शहरात पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी मुश्रीफ यांनी पहिले पाऊल टाकले आहे. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांचे हे बेरजेचे राजकारण सुरू असून ते ‘ अडीच तालुक्यातील पक्ष ‘ ही टीका दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा… अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये खदखद वाढली

मराठा प्रश्नाची गुंतागुंत

अजित पवार यांच्या स्वातंत्र्यदिनीच्या दौऱ्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीत वाद झडला होता. या प्रश्नावर मार्ग काढण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले होते. आता जालना जिल्ह्यातील आंदोलनावरून या प्रश्नाचा भडका उडाला असून त्याला राजकीय रंग चढत आहे. त्यामुळे ही संधी साधत ठाकरे गटाने अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी विरोधाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध करत थेट त्यांच्या मोटारी समोर आडवे पडण्याचा इशारा मराठा आंदोलनावेळी दिला आहे. सकल मराठा समाजाकडूनही पवार यांच्या विरोधात शेरेबाजी होऊ लागली असल्याने राजकारण आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही दौरा आव्हानात्मक बनताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या गोपनीय बैठकीवेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर परिस्थिती भडकेल, असे विधान केले असल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून होत आहे. गेले तीन आठवडे हा मुद्दा वादग्रस्त बनला असताना रेखावर यांनी आपण असे काही बोललो नसल्याचे दोनदा स्पष्ट केले आहे. आता तर त्यांनी पत्रक काढून असे काही बोललो असे वाटत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. हा घटनाक्रम पाहता मराठा आरक्षण आणि त्याचे उमटणारे वादग्रस्त तरंग या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा अनेक अंगांनी महत्वाचा बनला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur whose public meeting will be big sharad pawar or ajit pawar print politics news asj
Show comments