अलिबाग : कोकणात मित्रपक्षांची कोंडी करण्याचे धोरण भाजपने स्विकारले आहे. रायगड पाठोपाठ रत्नागिरी- सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसची तर रत्नागिरी-सिंधूदूर्गात शिवसेना शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र तरीही भाजपने शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना लोकसभा निवडणूकीत उतरविण्यासाठी हालचाली सूरू केल्या आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय मेळावे घेऊन निवडणूक तयारीही सूरू केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या मेळाव्यामधून भाजपनेत्यांकडून सुनील तटकरे यांना सातत्त्याने लक्ष्य केले जात आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असावा, सुनील तटकरे यांना उमेदवारी नकोच असा सूर भाजपने लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी कोंडी झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे.
रायगड पाठोपाठ रत्नागिरी-सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघावर आता भाजपने दावा सांगितला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणूकीत उतरवण्यासाठी प्रयत्न सरू केले आहेत. त्यांना लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची चिन्ह दिसत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तो शिंदे गटाला मिळावा अशी अपेक्षा पक्षपदाधिकाऱ्यांची होती. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. तशी मोर्चेबांधणी त्यांनी सूरू केली होती. मात्र नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना लोकसभेची तयारी करण्याची सूचना पक्षश्रेष्टींनी दिली आहे. त्यामुळे हा ही मतदारसंघ मित्रपक्षाला देण्याची भाजपची तयारी नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : बारामतीत कोणत्या पवारांचे वर्चस्व ? सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवाराची उत्सुकता
राज्यातील इतरभागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद क्षीण आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातल पेण हा एकच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तर सिंधूदूर्ग जिल्ह्यातही नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी आहे. मात्र तरिही दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितल्याने रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची तर रत्नागिरी सिंधूदूर्गात शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पहाडी नेत्या शहनाज गनई यांचा भाजपात प्रवेश; लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजकीय समीकरणं बदलणार?
कोकणात भाजपचे फारसे संघटन नाही. अशा परिस्थितीत इतर पक्षातील प्रस्तापित नेत्यांना पक्षात घेऊन संघटनात्मक बांधणीवर भर दिला होता. आता मित्र पक्षात झालेली फूट आणि बदललेली राजकीय परिस्थिती यावर बोट ठेऊन भाजपने कोकणातील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन्ही मित्र पक्ष दुखावले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : कधी भाजपा, कधी समजावादी पक्ष, तर कधी काँग्रेसशी युती; राष्ट्रीय लोक दल पक्षाचा राजकीय इतिहास काय? वाचा…
नैसर्गिक न्यायानुसार ज्या मतदार संघात ज्या पक्षाचा खासदार आहे त्या ठिकाणी त्याच पक्षाचा खासदार निवडून आला असेल त्याच पक्षाचा दावा राहील, असे युतीच्या जागा वाटपाचे सुत्र असते. जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.