रत्नागिरी : एकीकडे महायुतीतील सहकारी पक्षांच्या समन्वय समित्यांतर्फे कोकणात महामेळावे होत असतानाच येथील लोकसभेच्या दोन्ही जागांवर हक्क सांगत भाजपाने शिंदे गटावर दबाव तंत्राची खेळी सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी भाजपाच्या चाणक्यांनी शिवसेना फोडली तेव्हा या मोहिमेतील प्यादे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय क्रांतीचे जनक वगैरे संबोधून चिरंतन मैत्रीच्या आणाभाकाही घेतल्या. अलिकडे तोच प्रयोग अजित पवारांवरही यशस्वीपणे करण्यात आला. हे मांडलिकत्व स्वीकारताना आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये जास्त काही मिळालं नाही तरी आपलं आहे तेवढं तरी शाबूत राहील, अशी भाबडी आशा या फुटीर गटांचे नेते आणि लोकप्रतिनिधींना होती. शिवाय, रात्री शांत झोपेची हमी! पण लोकसभा निवडणुकीची घटिका समीप येऊ लागली आहे तसं या दोन्ही मतदारसंघांमध्ये, स्वतःची अशी फारशी ताकद नसूनही भाजपाचे स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी उमेदवारीसाठी हक्क सांगून पुन्हा एकदा त्यांची झोप उडवली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा दबदबा आहे, तसाच रायगड जिल्ह्यात फुटीर राष्ट्रवादी गटाचे खासदार सुनील तटकरे यांचा आहे. ठाकरेंच्या घराणेशाहीवर आगपाखड करतानाच दोघांनीही आपल्या पुढल्या पिढीचं राजकीय बस्तान नीट बसवून दिलं आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीतील विद्यमान लोकप्रतिनिधीला त्याची जिंकलेली जागा सोडण्याचा राजकीय संकेत गुंडाळून रायगड मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचं, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव भाजपा नेते पुढं रेटू लागले आहेत.
हेही वाचा : उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व मोडून काढणे कठीण, उमेदवाराचीच उत्सुकता
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातही ढुशा देण्याची संधी न सोडणाऱ्या चव्हाणांनी शुक्रवारी दापोली इथे पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना, ‘नव्या दमाचा नवा चेहरा’ अशी पाटील यांची भलावण करत रायगड मतदारसंघातून भाजपातर्फे त्यांच्या उमेदवारीचं पुन्हा एकदा सूतोवाच केलं. खरं तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना गटांची ताकद लक्षणीय आहे. त्यातही तटकरेंचा वरचष्मा आहे . पण येथील राजकीय साठमारीत आकुंचन पावत गेलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडं घेत भाजपा ताकद वाढवू पाहत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते रायगड जिल्ह्यातील भाजपाचं वर्णन शेकापची ‘बी टीम’ असं करतात. कारण महाविकास आघाडीत असल्याने स्थानिक निवडणुकीच्या राजकारणात शक्य नसलेल्या उचापती शेकापवाले भाजपामध्ये कार्यकर्ते पाठवून करतात, असं ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे. हे नव्या दमाचे नवे गडी धैर्यशीलरावही तिकडूनच वर्षभरापूर्वी भाजपामध्ये आले आणि थेट जिल्हाध्यक्ष बनले. आता त्यांचंच नाव पुढं करत भाजपाचे नेते अजितदादांचे सर्वांत जवळचे असलेल्या तटकरेंना तडजोडीच्या टेबलावर येण्यासाठी दबाव टाकत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा दबदबा आहे. अलिकडे राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे एवढंच नव्हे, तर भाजपाच्या गिरीश महाजनांप्रमाणेच शिंदे गटाचे ‘संकटमोचक’ म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली आहे. पण निवडणुकीच्या डावपेचांनी भाजपाने त्यांच्यावरही दबाव तंत्राचे प्रयोग सुरु केले आहेत. राज्य पातळीवर भाजपाबरोबर ‘महायुती’ असली तरी इथं त्यांचे परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी, माजी आमदार बाळ माने सामंतांच्या विरोधात उघडपणे शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख व माजी आमदार प्रमोद जठार समन्वय समितीच्या बैठकीत सामंतांच्या मांडीला मांडी लावून बसतात. पण दुसरीकडे येथील लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्याप्रमाणेच उमेदवारीसाठी आपणही उपलब्ध असल्याचं सूचित करत गोंधळ उडवून देतात, बाळ माने तर या बैठकीकडे फिरकतही नाहीत आणि ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या सामंतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंगळसूत्राचं पावित्र्य राखावं, असा सल्ला देतात.
हेही वाचा : गुजरात काँग्रेसमध्ये राम मंदिर सोहळ्यावरून मतमतांतर, मोठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत!
खरं तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील राजकीय चित्र पाहिलं तर बरीचशी ताकद शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आणि काही प्रमाणात राणेप्रणित भाजपामध्ये वाटली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तरेला शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास-योगेश कदम हे पिता-पुत्र आणि दक्षिणेला सामंत बंधुंची घट्ट पकड आहे. गुहागर-चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे शेखर निकम आणि लांजा-राजापूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी मिळून रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय अवकाश व्यापून टाकला आहे. तिथे कै. डॉ. नातू-गोताड-कुसुम अभ्यंकरांचा भाजपा तोळामासा उरला आहे.
कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये असं राजकीय चित्र असूनही केवळ केंद्र व राज्य पातळीवरील सत्ता आणि इडीच्या बळावर या पक्षाच्या नेत्यांनी इथं बेटकुळ्या फुगवून अजितदादा आणि शिंदे गटाला शह देण्याची खेळी सुरु केली आहे.