रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात भाजपाची वर्चस्वाची, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अस्तित्वाची लढाई सुरू झाल्याचे चित्र पुढे येत आहे. ‘अबके बार चार सौ पार’ अशी घोषणा करुन या निवडणुकीत भाजपा उतरला असल्यामुळे लोकसभेची प्रत्येक जागा त्यांच्यासाठी मोलाची आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेचे परंपरागत वर्चस्व असूनही इथे केवळ हातपाय पसरण्यासाठी नाही, तर स्वतःची पकड निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तत्कालीन अखंडित शिवसेनेचे विनायक राऊत दीड लाख मतांनी निवडून आले. तसेच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून विधानसभेच्या आठ जागांपैकी शिवसेनेने सहा जागा जिंकल्या. पण दीड वर्षापूर्वी झालेल्या फुटीनंतर आता या दोन गटांकडे विधानसभेच्या प्रत्येकी तीन जागा राहिल्या आहेत. त्या बळावर येथील लोकसभा मतदारसंघावरही शिंदे यांच्या शिवसेनेने हक्क सांगितला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन भाजपाला कोकणात पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे आहे. त्यामुळे या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत आणली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अकोल्यात भाजपची उमेदवारी कोणाला ?

लोकसभा निवडणुकीसाठी अशी दबावतंत्राची खेळी करतानाच आणखी सुमारे सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीही भाजपाने डावपेचांचा भाग म्हणून शिंदे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये विरोधी वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली. तेथे भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राजन तेली गेल्या विधानसभा निवडणुकीत केसरकरांकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनीच हे फलक लावल्याचा केसरकरांना संशय आहे आणि तशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. वरकरणी हे स्थानिक पातळीवरील राजकीय शह-काटशहाचे राजकारण वाटले तरी विधानसभेतही स्पष्ट बहुमताचे लक्ष्य असलेल्या आणि दीर्घकालीन उद्दिष्ट मनात ठेवून काम करणाऱ्या भाजपासाठी ‘ये तो पहली झॉंकी है..’ अशा धर्तीवरील राजकारणाचा भाग असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In konkan bjp s battle for supremacy whereas eknath shinde s shivsena is for survival in lok sabha election 2024 print politics news css