अलिबाग : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला निवडणूक होत आहे. या निवडणूकीत भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासमोर मतदारसंघ राखण्याचे आव्हान असणार आहे. एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपच्या निरंजन डावखरे यांच्यात होणं अपेक्षित आहे.

सगल दोन वेळा या मतदारसंघातून निरंजन डावखरे निवडून आले आहेत. पहिल्या वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दुसऱ्यावेळा भाजपकडून ते निवडून आले होते. यंदा तिसऱ्यांदा ते भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणार आहेत. कोकणचा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. एखाद दोन अपवाद सोडले तर या मतदारसंघातून सातत्याने भाजपचे उमेदवार निवडून येत आले आहेत. यंदा मात्र मतदारसंघासाठी चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून यंदा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष रमेश कीर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी कोकण म्हाडाचे माजी सभापती म्हणूनही यापुर्वी काम केले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून कीर ओळखले जात असत. विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कीर यांचा राजकीय उत्कर्ष झाला होता. या मतदारसंघातून रायगड जिल्ह्यातून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव अँड प्रविण ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना जेष्ठ नेते असलेल्या रमेश कीर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन तुल्यबळ उमेदवारांमधील थेट लढत यावेळी पहायला मिळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे कोकणातील या मतदारसंघात मतदारांचा कौल महायुतीच्या बाजूने राहणार का याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा… पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?

या मतदार संघात पालघर , ठाणे , रायगड , रत्‍नागिरी , सिंधुदुर्ग अशा पाच जिल्‍हयांचा समावेश आहे. यंदा मतदारसंघासाठी सुमारे २ लाख २३ हजार २२२ मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा १ लाख २० हजार अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळणारे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकूण मतदारापैकी सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्यातील मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात निम्याहून अधिक मतदार हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निवडणूक निकालात रायगड आणि ठाणेकरांचा कौल निर्णायक भुमिका बजावणार आहे.

हेही वाचा… लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद? कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष?

निरंजन डावखरे यांच्यासाठी महायुतीतील शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आणि आरपीय या पक्षांची साथ महत्वाची असणार आहे. निरंजन डावखरे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आणि सर्वाधिक मते ठाणे जिल्ह्यातील असल्याने त्याचा फायदा त्यांना मिळू शकणार आहे.

रमेश कीर यांच्यासाठी महाविकास आघाडीतील शिवेसेना ठाकरे गट, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांची साथ महत्वाची असणार आहे. निरंजन डावखरे रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यात फारसे सक्रिय नसल्यामुळे नाराजी आहे. ही नाराजी कीर यांच्या पथ्यावर पडू शकते.