प्रदीप नणंदकर
औसा विधानसभा मतदारसंघातील कासारशिरसी गावाला तालुक्याच्या दर्जा देण्याच्या आश्वासनावरुन भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये वाद सुरू झाले आहेत. नव्या तालुका निर्मितीला निलंगेकर यांचा विरोध आहे.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू पवार यांनी कासारशिरसी या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. त्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून अप्पर तहसील कार्यालय कासारशिरसी येथे मंजूर झाले. कासारशिरसी हे गाव निलंगा तालुक्यातील आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघात ते औसा विधानसभा मतदारसंघात येते. कासारशिरसीला अप्पर तहसील मंजूर झाल्यानंतर निलंगा तालुक्यातील अनेक गावे त्याला जोडले गेली त्यामुळे दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर कृती समिती तयार करून या समिती मार्फत या निर्णयाला विरोध केला जात आहे. भर पावसातही वॉटरप्रूफ मंडप टाकून धरणे आंदोलन करण्यात आले. यात सर्वपक्षीय लोकांचा सहभाग होता. कासारशिरसी येथे घेतलेल्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी महिलांनी मोठा मोर्चा काढला यातून हा वाद पेटला आहे. निलंगा कृती समितीच्या वतीने दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची तालुका एकसंघ हवा अशी भूमिका होती. त्यामुळे अप्पर तहसील झाल्यानंतर निलंगा तालुक्यातील सुमारे ३१ गावांनी ठराव देत आपल्याला निलंगा तालुका पाहिजे अशी मागणी केली.
हेही वाचा… शरद पवार यांच्या तरुणाईमधील करिष्म्यामुळे अजित पवार गटाकडून राज्यभर युवक दौऱ्यांचे नियोजन
१९९८ साली युती शासन होते त्या काळात निलंगा तालुक्याचे विभाजन होऊन शिरूर अनंतपाळ हा नवीन तालुका झाला ,काही गावे देवणी तालुक्याला जोडली गेली. उदगीर तालुक्याचे विभाजन होऊन जळकोट तालुका निर्मिती झाली. अहमदपूर तालुक्याचे विभाजन होऊन चाकूर तालुका तर लातूर तालुक्याचे विभाजन होऊन रेणापूर तालुका झाला. या निर्णयाला दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी विरोध केलेला नव्हता असे अभिमन्यू पवार समर्थकांचे म्हणणे आहे. तालुका एक संघ रहावा असे निलंगेकरना वाटत होते ही भूमिका कृती समिती का मांडत आहे. निलंगेकर यांचे नाव घेऊन आमदार संभाजी पाटील समर्थक जाणीवपूर्वक अभिमन्यू पवार यांना विरोध करत असल्याचे अभिमन्यू पवार समर्थकांचे म्हणणे आहे. कासारशिरसी व परिसरातील गावोगावी कार्यक्रम घेत तालुका निर्मितीला पाठिंबा दिला जातो आहे.
हेही वाचा… पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांचीच छाप
निलंगा येथे विविध व्यापारी संघटनांच्या वतीने बैठक घेत तालुका निर्मितीला विरोध दर्शविण्याच आला. अनेक गावातील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन आपल्याला निलंगा तालुक्यातच राहायचे आहे असे म्हटले आहे. जनभावनेचा आदर करत आपण जन भावनेशी एकरूप राहून काम करणार आहोत. आमचा नव्या तालुका निर्मितीला अप्पर तहसीलला विरोध नाही. मात्र, यातून तालुक्याचे विभाजन होत असेल तर अडचणी निर्माण होतील. याप्रकरणी सरकारने दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल,आपण जनतेच्या सोबत राहणार असल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
हेही वाचा… वैद्यकीय महाविद्यालयावरून वर्धा जिल्ह्यातील राजकारण तापले
आमदार अभिमन्यू पवार यांना संपर्क साधला असता आपण निवडणुकीत जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी पहिले पाऊल उचललेले आहे विकासाच्या दृष्टीने आपण काम करत आहोत कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेऊ. गावकऱ्यांशी संवाद साधून जाणीवपूर्वक कोणी विकासासाठी वैयक्तिक विरोध करत असेल तर त्याला आपण भीक घालणार नसल्याचे ते म्हणाले.