लातूर : निलंगा येथे काँग्रेसने घातलेल्या धोंडे जेवणाला तीन हजारांची गर्दी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातुरात ६०० जणांची नऊ विषयांवर विकास परिषद घेतली. या दोन राजकीय कार्यक्रमांमुळे लातूर जिल्ह्यातील निलंगेकर – देशमुख हा पूर्वापार वाद नव्याने उफाळला असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे आमदार अमित देशमुख यांना विकासाच्या प्रश्नावर आमने-सामने चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे संभाजी पाटील निलंगेकरांना भाजपातील अभिमन्यू पवार यांच्या समर्थकांकडून डिवचले जात आहे. निलंगा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा व धोंडे जेवणात पुरण पोळीचा बेत झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते लातूरचे आमदार अमित देशमुख. निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या महाविद्यालयाच्या प्रांगणाबाहेर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. तीन हजारांपेक्षा अधिक लोकांना धोंडे जेवण दिल्यावर अमित देशमुख यांनी सुमारे सव्वा तास भाषण केले. काँग्रेस पक्षचं देशाला कसा तारणार आहे व देशातील भाजप व मित्र पक्षावरील विश्वास कसा उडत चालला आहे, हे सांगत आगामी काळात निलंग्यातदेखील परिवर्तन होईल हे आवर्जून सांगितले.

हेही वाचा – शरद पवार गुरुवारी मराठवाड्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

दुसऱ्या दिवशी लातूर येथे ‘जनजागरण मंच’च्या नावाखाली जिल्ह्यातील कृषी, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण, महिला सुरक्षा अशा नऊ विषयांवर दिवसभराचे चर्चासत्र ठेवले व त्यात सुमारे ६०० जण सहभागी होते. जिल्ह्यातील प्रश्न समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे निलंगेकरांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनी निलंगा येथे पंचायत समितीच्या कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ मी निलंगेकर यांच्या सुसंस्कृत घरात जन्मलेलो आहे. आम्ही केवळ विकासावर बोलू. तुम्हीही जिल्ह्याचे पालकमंत्री होता व मीही पालकमंत्री होतो, तुमच्या हार तुऱ्यावर जेवढा खर्च झाला तेवढे तरी पैसे निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी तुम्ही दिले का, उलट माझ्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात लातूरसाठी मी किती निधी दिला, लातूरमधील प्रमुख रस्त्यांची दुरुस्तीही केली. विकासावर खुली चर्चा करण्याची आपली तयारी आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांनी विकासाचे राजकारण केले तीच परंपरा आपण जपू या. सर्व आमदारांच्या घरी जाऊन आपण विकासावर एकत्र येण्याचे आवाहन करणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – नूह हिंसाचार : महापंचायतीला भाजपाचा आमदाराची उपस्थिती, २८ ऑगस्टला विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेला पुन्हा सुरूवात!

निलंग्यात हे सारे घडत असतानाच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विकासासाठी निधी दिला, या कारणामुळे मुस्लीम समाजाच्या वतीने औसा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पाशा पटेल होते. पाशा पटेल यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यात मंत्रिपदाची संधी मिळणार असेल तर अभिमन्यू पवार यांच्याशिवाय दुसरे नाव नाही, असे सांगत आपले समर्थन अभिमन्यू पवार यांना असल्याचे जाहीर केले. निलंगेकर व पवार यांच्या भाजपातील अंतर्गत वादाला पाशा पटेल यांनी नवी फोडणी दिल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In latur district it seems that sambhaji nilangekar and amit deshmukh previous dispute has erupted again print politics news ssb