लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने यावेळी माला जंगम समाजातील डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली, या उमेदवारीमुळे लिंगायत समाजाची मते आपल्याकडे वळतील ,लिंगायत समाजात सहानुभूती पसरेल अशी अटकळ काँग्रेसने बांधली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचा हा आनंद औट घटकेचाच ठरला आहे.
लातूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये लिंगायत ,मराठा हा वाद गेल्या ३० वर्षापेक्षा अधिक काळापासून आहे . १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहरातील बसवेश्वर पुतळ्याच्या वादामुळे कै.विलासराव देशमुख यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता .लिंगायत समाजाचा प्रचंड रोष त्यांच्यावर होता .त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात लिंगायत ,मराठा वाद हा उफाळत असतोचं.
हेही वाचा : नगरमध्ये सुजय विखे यांना निलेश लंके यांचे आव्हान
डॉक्टर शिवाजी काळगे यांनी २०१४ मध्ये भाजपकडे उमेदवारी मागितली ,भाजपने ती दिली नाही . २०१९ मध्ये डॉ. काळगे यांनी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामार्फत उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळीही त्यांना त्यात यश आले नाही .यावेळी काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली यातून लिंगायत समाजामध्ये सहानुभूती तयार होण्यास सुरुवात झाली होती. या सहानुभूतीचा लाभ लोकसभेत पराभवाची नामुष्की टाळण्यापासून होण्यापेक्षाही आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर शहर व ग्रामीण मतदार संघातील लिंगायत समाजाची नाराजी काही प्रमाणात दूर होईल हा अंतस्थ हेतू होता. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा जोर धरायला लागली. रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात रीतसर प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील राजकारणाला चांगलीच कलाटणी मिळणार आहे. लिंगायत समाज काळगेना काँग्रेसने उमेदवारी दिली म्हणून काँग्रेसच्या पाठीमागे राहील की शिवराज पाटील चाकूरकर यांची स्नुषा भाजपात दाखल झाल्यामुळे भाजपाकडे लिंगायत समाज वळेल , हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : चावडी: बाळासाहेब भवन की ?
आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशामुळे वेगळीच गणित मांडले जाण्याची शक्यता आहे .लोकसभा निवडणुकीतही चाकुरकरांच्या प्रवेशामुळे सोलापूर ,धाराशिव ,लातूर ,नांदेड या चार लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.