लिंगायत मतपेढी बांधत सुरू असणाऱ्या लातूर मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचाराला मोदी सभेतून उत्तर देत भाजपने त्यांची प्रचार यंत्रणा आता सक्रिय केली आहे. ४२ अंश तापमान असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातून त्यांचा लोकसभा मतदारसंघातील समस्या आणि त्या सोडवणुकीसाठी नियोजन सुरू असल्याची माहिती मतदारांपर्यंत पोहचली. लातूरच्या विकासाला रेल्वे डब्याच्या निर्मितीमुळे हातभार लागेल, अशी चर्चा आता भाजपने सुरू केली आहे.
मोदींच्या तुलनेत दुसरा प्रभावी नेता काँग्रेस पक्षाकडे नाही त्यामुळे आगामी पाच दिवस मोदींचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी काँग्रेसची मंडळी डावपेच आखत आहेत .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारी मतदारसंघात आहेत. छोट्या ,छोट्या सभावर्ती काँग्रेसने जोर लावला आहे .सचिन पायलट हे सांगता सभेला येण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे मोठा वक्ता नसला तरी अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचायची यंत्रणा काँग्रेस वाढवते आहे तर भाजपच्या वतीने तीन मे रोजी नितीन गडकरी ,योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस अशा सभा घेतल्या जाणार आहेत.
हेही वाचा : संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचार सभांमध्ये केंद्रस्थानी, दावे-प्रतिदावे नेमके काय?
मोदींच्या सभेचे वातावरण कमी व्हावे यासाठी मोदींवर समाजमाध्यमातून टीका केली जात आहे. मोदी म्हणजे चिनी वस्तू, मोदी म्हणजे खोटे बोलणारे ,मोदी म्हणजे विश्वासार्हता नसलेले अशा टिपण्या काँग्रेसच्या मंडळी कडून केल्या जात आहे. पण काहीशी आळसावलेली भाजपची यंत्रणा पंतप्रधानांच्या सभेमुळे सक्रिय झाली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात काँग्रेसची गाडी सुसाट असल्याची चर्चा होती. त्याला सभेच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे. लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यापासून, लातूरच्या केंद्रीय विद्यापीठापर्यंतची आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हे दोन्ही प्रश्न लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत. या आश्वासनांचा प्रचारात व निकालात लाभ होईल अशी चर्चा भाजप समर्थक मंडळीत आहे . काँग्रेसने लिंगायत मताला हात घातल्यानंतर अर्चना पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे जातीय मतपेढीच्या पुढे जाणारा प्रचार व्हावा असा भाजपचा प्रयत्न सुरू झाला आहे.