सोलापूर : प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे चुलत बंधू व सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा पाठिंबा मिळविण्यात भाजपने यश मिळविले आहे. एकीकडे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करून कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपमध्ये येण्यासाठी डाव टाकला जात असताना दुसरीकडे मोहिते-पाटील घराण्यातील एक मोहरा स्वतःकडे वळविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट अणि भाजपमध्ये खेचाखेचीच्या राजकारणामुळे वातावरण तापले आहे.
धवलसिंह मोहिते-पाटील हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे दिवंगत बंधू, माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. प्रतापसिंह हे १९९७ साली तत्कालीन युती सरकारच्या काळात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात येऊन ते भाजपमध्ये गेले होते आणि काही काळ सहकार राज्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००३ साली सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडूनही आले होते. तोपर्यंत थोरले बंधू विजयसिंह यांच्याशी त्यांचे संबंध टिकून होते. परंतु प्रतापसिंह यांचे २०१८ साली निधन होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी नातेसंबंध तोडून टाकले. एवढेच नव्हे तर स्थानिक राजकारणात प्रतापसिंह यांच्या पत्नी पद्मजादेवी व पुत्र धवलसिंह यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, अकलूज ग्रामपंचायत आणि नगर पंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत पद्मजादेवी आणि धवलसिंह या मायलेकाने उभे केलेले आव्हान विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मोडून काढले होते. २०१४ साली माढा लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात स्वतः प्रतापसिंह यांनी अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून लढत दिली होती. परंतु त्यांना अवघी २५ हजार मते पडून त्यांना आनामत रक्कम गमवावी लागली होती. मोहिते-पाटील घराणे एकसंघ असताना सदाशिवनगरचा शंकरसहकारी साखर कारखाना प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात होता. त्यांच्या पश्चात सदैव आजारी असलेला हा कारखाना शेवटी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात बंद पडला आणि अवसायानात निघाला होता. परंतु विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र भाजपचे आमदार रणजितसिंह यांनी सरकारकडून आर्थिक साह्य घेऊन या कारखान्याला पुन्हा उभारी दिली. या कारखान्याच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते-पाटील यांचे उरलेसुरले अस्तित्वही संपुष्टात आले.
हेही वाचा : काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल
या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होऊन पुन्हा वावरू लागले असतानाच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या बंगल्यात पहाटे संशयास्पदरीत्या प्रवेश केलेल्या एका मागासवर्गीय तरूणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी धवलसिंह व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेव्हापासून धवलसिंह हे भूमिगत झाले होते. मात्र माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील घराण्यातील भाऊबंदकीतून चुलत बंधू धैर्यशील यांच्या विरोधात त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याचा फायदा भाजपला किती होणार, याची उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते.