मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी १३ मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट ) विरुद्ध शिवसेना ( शिंदे ) गट असा सामना होत आहे. दोन मतदारसंंघांत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी लढत आहे. जनाधार असलेली खरी शिवसेना व खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे १५ मतदारसंघांतील निकालावरुन स्पष्ट होणार आहे.
राज्यात दोन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तशाच प्रकारच्या फुटीची पुनरावृत्ती झाली. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील शिवसेना पक्षाला मान्यता दिली. निवडणूक आयोगाने असाच निकाल अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रावादी काँग्रेसबाबत दिला. अजित पवारांच्या गटाला खरा मूळ पक्ष म्हणून मंजुरी दिली. राज्यात आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट अशी शिवेसनेचीही स्थिती आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणाऱी लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे.
हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास
महाराष्ट्रात काँग्रेस, शिवेसना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती यांच्यात निकराची लढाई आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक, कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, शिर्डी आणि हातकणंगले या १३ मतदारसंघात थेट सामना आहे.
हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फक्त चारच जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी बारामती व शिरुर मध्ये शरद पवार गटाशीच त्यांच्या पक्षाची लढत आहे, तर उर्वरित रायगड व धराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाशी सामना आहे. महाविकास आघाडीत शरद पवार गट दहा जागा लढवित असून, त्यातील भिवंडी, सातारा, वर्धा, नगर, बीड, माढा, रावेर व दिंडोरी या आठ मतदारसंघात भाजपशी त्यांच्या पक्षाचा सामना आहे. शिवसेना ठाकरे गटाची ईशान्य मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, सांगली, जळगाव या मतदारसंघांत भाजपबरोबर लढाई आहे. भाजप व काँग्रेस यांच्यात १५ मतदारसंघात जोरदार लढत आहे. राज्यातील एकूण ४८ पैकी १३ मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि दोन मतदारसंघातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.