Mahayuti : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. तसंच २१ डिसेंबरला खातेवाटपही पार पडलं आहे. मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये बराच फरक आहे. कारण भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काही सूक्ष्म बदल करत भाजपाने मोठा भाऊ असल्याचा वरचष्मा कायम ठेवला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातली स्पर्धा आहेच. दुसरीकडे भाजपाने मात्र आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतं आहे यात काहीच शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निकालात कुणाला किती जागा?

२३ नोव्हेंबरला जो निकाल लागला त्यात भाजपाचे १३२ आमदार निवडून आले. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपाकडे सर्वाधिक मंत्रिपदं आणि मुख्यमंत्री हे महत्त्वाचं पद राहणार हे सरळ होतं. भाजपाकडे २० मंत्रिपदं मिळाली आहेत तर राष्ट्रवादी आणि शिवसेना १२ आणि १० पदं मिळाली आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही कठीण होतं ते खातेवाटपाचं काम. ज्यासाठी जवळपास १५ दिवसांचा कालावधी लागला.

भाजपाच्या सूत्रांनी काय सांगितलं?

भाजपाच्या एका वरच्या फळीतल्या नेत्यांच्या सूत्रांपैकी एकाने इंडियन एक्स्प्रेला सांगितलं की एकनाथ शिंदे एक पायरी खाली उतरत उपमुख्यमंत्री हे पद घ्यायला तयार झाले. पण भाजपावर त्यांनी दबाव टाकून पाहिला होता. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी महत्त्वाच्या खात्यांसाठी जास्त आग्रही होती हे कळलं. एकनाथ शिंदे यांना कळून चुकलं होतं की त्यांना मुख्यमंत्री होता येणार नाही त्यामुळे ते गृहमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र भाजपाने ते पदही आपल्याकडेच ठेवलं. त्यानंतर नगर विकास, महसूल आणि पाटबंधारे विभाग ही खाती मागितली गेली. त्यांनी एकूण १३ मंत्रिपदं मागितली होती. तसंच ते उपमुख्यमंत्री होण्यासही शेवटच्या क्षणी तयार झाले होते. भाजपाने त्यांना १२ कॅबिनेट मंत्रिपदं दिली. तसंच भाजपाने राम शिंदेंना विधान परिषद अध्यक्ष केलं. भाजपा आणि शिवसेनेतल्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योग मंत्रिपदावरुनही भाजपा आणि शिवसेनेत थोडेफार खटके उडाले होते. मात्र अखेर हे पद उदय सामंत यांना मिळालं. शिवसेना हे पद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरली.

भाजपा आणि शिवसेनेत काहीसा संघर्ष

भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्री पद आणि खातेवाटप यावरुन काहीसा संघर्ष झाला याचं एक कारण ठरलं ते म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. अजित पवार हे अर्थखात्यासाठी आग्रही होते. तसंच त्यांना आणखी काही मंत्रिपदं हवी होती जसं की कृषी, महिला आणि बाल कल्याण ही खाती ते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले. नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की महत्त्वाच्या खात्यांबाबत आम्ही तडजोड करणार नाही. मात्र जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना योग्य वाटा मिळेल. हा वाटा मिळाला आहे यात शंकाच नाही, मात्र भाजपाने त्यांचा शब्द खरा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र भाजपाने त्यांचं वर्चस्व कायम ठेवलं आहे आणि आपणच मोठा भाऊ आहोत हे दाखवून दिलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra balancing act of big brother how bjp hammered out mahayuti deal over portfolios scj