मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या यादीत पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे आणि स्मिता वाघ यांच्याबरोबरच रक्षा खडसे व डॉ. हीना गावीत यांना तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिलांना एक तृतीयांश आरक्षणाचा निर्णय घेतला असला तरी ते २०२९ नंतर लागू होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने २० उमेदवारांच्या राज्यातील पहिल्या यादीत पाच महिलांना स्थान देऊन महिलांना चांगले प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना विधानपरिषद किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी होती. ओबीसींच्या नेत्या असलेल्या पंकजा यांना लोकसभेसाठी उमेदवारी देवून भाजपने ती दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या भगिनी व दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना विधानसभा उमेदवारी मिळणार का, याबाबत प्रश्न चिन्ह आहे. उत्तरमध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर टांगती तलवार असून त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार की आमदार आशिष शेलार यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करणार, याचा निर्णय तीन-चार दिवसांत अपेक्षित आहे. महाजन यांच्यापेक्षा शेलार लढल्यास विजयाची शक्यता अधिक असल्याचे सर्वेक्षण आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महायुती दुभंगली; ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये वादावादी
गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवीत असलेल्या आणि एकेकाळी मुख्य मंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देवून राष्ट्रीय राजकारणात पाठविण्यात आले आहे. ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांची सून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता होती. हीना गावीत यांचे वडील विजयकुमार गावीत हे राज्यात मंत्री असून हीना यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. मात्र ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा राजकीय वारसा सांभाळत असलेल्या पूनम महाजन यांना मात्र भाजपने दुसऱ्या यादीत स्थान दिलेले नाही.
हेही वाचा : केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा?
जळगावमधून मंत्री गिरीश महाजन यांचे तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत होते. दोघेही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. पण मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली असून जळगावमधून वाघ यांना संधी मिळाली आहे. वाघ या भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा, विधानपरिषद आमदार होत्या.
हेही वाचा : हातकणंगलेत राजू शेट्टी स्वबळावर, तिरंगी लढत अटळ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार यांना दुसऱ्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत भाजप-शिवसेनेत मतभेद असल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. ज्या जागांवर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद नाही, अशा जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.