जालन्यातील ओबीसी समाजाच्या मेळाव्यात छगन भुजबळ व अन्य नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना दिलेला इशारा व त्यावर मराठा समाजाच्या नेत्यांकडून उमटलेल्या प्रतिक्रियेमुळे सामाजिक दुहीचे बिजे रोवली जात असल्याचे चित्र आहे. पुरोगामी महाराष्ट्र अशी प्रतिमा असलेल्या राज्यात पूर्वी अभिजन विरुद्ध बहुजन अशी जुनी दुही बघायला मिळत असे. पण मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ओबीसी समाजातही प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. जरांगे पाटील यांच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमते घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण जरांगे पाटील ज्या ज्या मागण्या करतात त्या सरकार मान्य करते. जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री शिंदे अधिक ताकद देत असल्यानेच ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. जालन्यातील ओबीसी समाजाच्या मेळाव्याला शिंदे गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता. यावरून शिंदे गटाची मानसिकता लक्षात येते, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : पाण्यावरून संभाजीनगर, नगर, नाशिकमधील वाद वाढला
छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील नाराजीला वाट करून दिली. मागील दाराने ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला वाटेकरी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. अंबडमधील सभेत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरून जरांगे पाटील संतप्त झाले आणि जशास तसे उत्तर देण्याची भाषा करू लागले. आपल्या विरोधात कोणी बोलायचे नाही हेच जणू काही जरांगे पाटील यांना सुचवायचे असावे. भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडाळकर आदी सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला हात लावल्यास गप्प बसणार नाही हा इशारा दिला. सर्वच ओबीसी नेत्यांचा रोख हा जरांगे पाटील यांच्या दिशेने होता.
हेही वाचा : गोपीचंद पडाळकर यांची विधानसभा आमदारकीची तयारी सुरू
ओबीसी नेत्यांनी टीका केल्याने जरांगे पाटील अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कवचकुंडल लाभल्याने आपल्याला कोणी रोखू शकत नाही हा जरांगे पाटील यांचा समज झालेला असावा. पण ओबीसी नेत्यांनी थेट जरांगे पाटील यांनाच अंगावर घेतल्याने प्रथमच त्यांना जाहीर आव्हान दिले गेले. त्यातूनच प्रत्युत्तर देण्याची भाषा जरांगे पाटील करू लागले आहेत.
हेही वाचा : ‘उत्तर प्रदेशमध्ये कोणाशीही युती नको’, काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका; इंडिया आघाडीत बिघाडी?
ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदे यांनाही एक प्रकारे इशाराच दिला. सरसकट मराठा आरक्षण देऊ नका, त्याचे वाईट परिणाम होतील हे निदर्शनास आणुन दिले. सरसकट आरक्षणास शिंदे वगळता कोणीच सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. ओबीसी मेळाव्यामुळे मराठा नेत्यांना उघडपणे आव्हान दिले गेले. आता जरांगे पाटील व अन्य नेते प्रतिआव्हानाची भाषा करतील. यातून राज्यातील सामाजिक वातावरण मात्र बिघडत जाणार आहे. ही वाढती सामाजिक दुही मिटविण्यासाठी नेतेमंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पण जरांगे पाटील अधिक वातावरण तापवू लागल्यास ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे.