राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला अजिबात आव्हान नसून, लोकसभेच्या ४५ जागा नक्कीच जिंकू, असा ठाम आत्मविश्वास महायुतीचे नेते एका सूरात व्यक्त करीत असताना ‘ईडी’ तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणा शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विरोधात निवडणुकीच्या तोंडावर एकदम सक्रिय का झाल्या, असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी ईडीने अटक केली. यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेतील करोना काळातील घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. आमदार रविंद्र वायकर यांच्या व्यावसायिक आस्थापनांवर ईडीने छापे टाकले. कोकणातील आमदार राजन साळवी यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली असून, त्यांच्यावरही कारवाईचा बगडा उभारला जाऊ शकतो. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे फर्मान काढले. आणखी काही नेत्यांवर कारवाईचे संकेत भाजपच्या गोटातून देण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक ज‌वळ आली असताना ईडी ही केंद्रीय यंत्रणा पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू या राज्यांमध्ये सक्रिय का झाली , असा सवाल केला जात आहे. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे अजिबात आव्हान नाही. ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. कदाचित सर्व ४८ जागाही जिंकू, असा विश्वास महायुतीचे संकोटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. महायुतीला एवढा ठाम आत्मविश्वास आहे , मग ईडी ही केंद्रीय यंत्रणा सक्रिय होण्याच्या वेळेबद्दल वेगळा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : आंध्र प्रदेशमध्ये डॉ. आंबेडकरांचा १२५ फुटी भव्य पुतळा अन् निवडणुकीचे गणित, जगनमोहन यांना दलित मतदार साथ देणार का?

महाराष्ट्रात सारे वातावरण अनुकूल आहे आणि राम मंदिराच्या उद्धाटनानंतर चित्र आणखी बदलेल, असा दावा भाजपकडून व्यक्त करण्यात येत असला तरी वस्तुस्थिती तेवढी अनुकूल नसावी, असा अर्थ काढला जात आहे. शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाबद्दल सहानुभूती वाढली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालपत्रातील त्रुटींकडे लक्ष वेधल्यावर भाजपच्या विरोधात हवा तयार होऊ लागली. यानंतर लगेचच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली. ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला चव्हाण हे उपस्थित होते. त्याआधी ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थान आणि व्यावसायिक आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. ठाकरे गटाचे नेते भ्रष्टाचारात कसे सहभागी आहेत हे चित्र तयार करून बदनामी करण्याची भाजपची खेळी असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. रविंद्र वायकर यांच्या मागे शुक्लकाष्ट लागू शकते. अनिल परब हे ईडीच्या रडारवर आहेतच. कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे छापे पडले. त्यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. साळवी यांनी स्वत:च आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ?

राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळणे कठीण असल्याचे विविध सर्वेक्षणात आढळले असावे. यामुळेच विरोधी नेत्यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे. खिचडी किंवा करोना घोटाळ्याची चौकशी गेली दोन वर्षे सुरू होती. मग आताच ईडीने अटकसत्र किंवा चौकशी कशी काय सुरू केली, असा सवाल विरोधी गोटातून केला जात आहे. राजन साळवी यांची गेले वर्षभर चौकशी सुरू आहे. आताच कसे छापेसत्र आणि चौकशी सुरू झाली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra why ed cbi become active against opposition leaders ahead of elections print politics news css
Show comments