देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात असे समीकरण आकारास आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी हे नवे समीकरण ठळकपणे अनुभवास आले.

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती दिली किंवा निर्णय रद्द केले. यावरून शिंदे हे नाराज असल्याची नेहमीच चर्चा असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेली दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा शिंदे यांनी शहा यांची दोन दिवसांत दोन वेळा स्वतंत्रपणे भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

रायगड दौऱ्यात अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यामागे शिंदे व त्यांच्या पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होता. शहा यांनी तटकरे यांच्याकडे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले असले तरी त्यामागे भाजपचे नेते असल्याची शिंदे गटाची भावना आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे विलंब लावून शिंदे व अजित पवार गटात वितुष्ट निर्माण करीत असल्याचे शिंदे गटातील नेत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय शिंदे गटाकडे असलेल्या परिवहन खात्याची कोंडी करण्याचा प्रयत्न वित्त खात्याकडून झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येतो.

या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी अमित शहा यांची दोनदा स्वतंत्रपणे भेट घेऊन नाराजीला वाट करून दिली. फडणवीस व अजित पवार हे दोघे आपली कशी कोंडी करतात हे शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्यापेक्षा कमी आमदार असलेल्या राष्ट्रवादीला सरकारमध्ये झुकते माप मिळते, अशीही शिंदे यांची तक्रार होती. तसेच नगरविकास विभागाशी संबंधित काही प्रस्ताव रखडविण्यात आल्याची तक्रारही शिंदे यांनी केल्याचे सांगण्यात येते. निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांची अडवणूक केली जाते, हा शिंदे गटाचा आक्षेप आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले जमवून घेतले आहे. यातूनच अजितदादांना सरकारमध्ये झुकते माप मिळते. अजितदादांच्या बारामतीला पहिल्या १०० दिवसांतच ११०० कोटींचा निधी मंजूर झाला. राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांना योग्य निधी मिळेल याची खबरदारी पवार घेतात. मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यानेच अजितदादांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र असल्याची शिंदे गटाचे म्हणणे आहे.

फडणवीस व अजित पवार हे दोघे शिंदे यांच्यावर कुरघोडी करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडून तशी नेहमी तक्रार केली जाते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिंदे यांच्या गटाला काही दिलासा मिळतो का हे लवकरच समजेल.