मोदी-शहा यांच्या कार्यकाळात भाजपमध्ये कोणाची मनमानी किंवा दबावाचे राजकारण खपवून घेतले जात नाही. रातोरात मुख्यमंत्र्यांना हटविल्याची उदाहरणे ताजी आहेत. पण सध्या राज्यातील निवडणुकीत मित्र पक्षांबरोबरच स्वपक्षीयांचीही मनमानी निमूटपणे खपवून घ्यावी लागत आहे. नवी मुंबईत गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार असताना त्यांच्या मुलाने शेजारील बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) भाजप उमेदवाराच्या विरोधातच अर्ज दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्या पुतण्याने शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला.
हेही वाचा : काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांना वंचितची उमेदवारी, मुस्लीम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा?
तेथे कोकणात एका मुलाला भाजपने उमेदवारी दिल्यावर दुसऱ्या पुत्राची महत्त्वाकांक्षा उफाळून आली. पण मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे) वाट्याला गेलेला. मग नारायण राणे यांनी मुलाला शिवसेनेत (शिंदे) कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिली. राणे यांची दोन्ही मुले निदान महायुतीतून लढत आहेत. पण गणेश नाईक यांचे पुत्र थेट भाजपलाच आव्हान देत आहेत. भुजबळांचे पुतणे अपक्ष असले तरी शिवसेनेच्या (शिंदे) आमदाराच्या पराभवाचा त्यांनी विडा उचलला आहे. राणे, भुजबळ वा गणेश नाईक हे सारेच जुने शिवसैनिक. अन्य पक्षांमध्ये प्रवास केला तरी त्यांच्यातील आक्रमकपणा कमी झालेला नाही. त्यांची दादागिरी भाजप आणि मित्र पक्षांना सहन करावी लागत आहे.