परभणी: पाथरीत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा अजित पवार गट लढणार की एकनाथ शिंदे यांची शिवसेना यावरून सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे. विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर यांच्याकडे कोरा ‘एबी फॉर्म’ अजित पवारांनी दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सईद खान यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत तळ ठोकून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. एकूणच महायुतीतल्या या दोन पक्षात पाथरीसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यात पाथरीच्या जागेवरून महायुतीतले दोन पक्ष सध्या परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ज्या अपेक्षेने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःच्या पक्षाकडे घेतले, राजेश विटेकर यांच्या रूपाने विधान परिषदेची आमदारकी दिली त्या जिल्ह्यात विधानसभेची किमान एक तरी जागा लढवायला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही वाटते. जिल्ह्यातल्या चार विधानसभेच्या जागांमध्ये केवळ पाथरीची एकमेव जागा या पक्षाला लढण्यासाठी सोयीची वाटत आहे. विटेकर हे विधान परिषदेचे आमदार असले तरी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. एवढेच नाही तर त्यांच्याकडे सोमवारी विधानसभेचा कोरा ‘एबी फॉर्म’ अजित पवारांनी दिल्याचे कार्यकर्ते जाहीरपणे सांगू लागले. विटेकर यांच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे इच्छुक उमेदवार सईद खान अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा : Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

सईद खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पाथरी मतदारसंघातील कार्यकर्ते व समर्थकांचा मोठा ताफा मुंबईकडे रवाना झाला. कोणत्याही परिस्थितीत पाथरीची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिली जाऊ नये अशी मागणी सईद खान व त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आपण दोन जागांवर वाटल्यास पाणी सोडू पण पाथरीवरचा आपला हक्क सोडणार नाहीत असे या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याचे सईद खान यांच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून सईद खान हे पाथरी विधानसभेची तयारी करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्य आघाडीचे राज्याचे नेतृत्व सईद खान हे करतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गेल्या काही महिन्यात भरीव असा विकास निधीही दिला. मध्यंतरी या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी पक्षाचे नेतेही पाथरीत येऊन गेले. या पार्श्वभूमीवर महायुतीत पाथरीची जागा शिंदे सेनेला सोडण्यात यावी यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव तयार केला जात आहे तर दुसऱ्या बाजूने राजेश विटेकर हेही पाथरीसाठी कमालीचे आग्रही आहेत.

हेही वाचा : मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढावी यासाठी सुरुवातीपासूनच पक्षाच्या वतीने मोठे प्रयत्न केले जात आहेत. लोकसभेच्या जागेवर लढण्याची सर्व तयारी करूनही विटेकरांना महादेव जानकारांसाठी ही जागा सोडावी लागली. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःच्या पक्षाकडे घेऊन कार्यकर्त्यांना विकास निधीच्या रूपाने भरीव आर्थिक मदत राष्ट्रवादीने केली. विटेकर यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. एवढे सगळे केल्यानंतर किमान जिल्ह्यातली एक तरी जागा महायुतीत पक्षाकडे असायलाच पाहिजे असे पक्ष नेतृत्वाला वाटते. या पार्श्वभूमीवर पाथरीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात उमेदवारीसाठी कमालीची झुंज सुरू आहे.