छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आणि अपक्ष उमेदवार गफ्फार कादरी अध्यक्ष असणाऱ्या शिक्षण संस्थानी प्रचारासाठी शिक्षक आपल्या हाताशी रहावेत म्हणून निवडणूक अयोगाला शिक्षकांची नावे कळवली नाहीत. त्यामुळे निवडणूक अधकाऱ्यांनी ३५ मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर मराठवाड्यातील विविध मतदारसंघात शिक्षक प्राध्यापकांकडून होणाऱ्या प्रचाराची चर्चा सुरू झाली आहे. सिल्लोड, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाबरोबरच सिल्लोड, गंगापूर, घनसावंगी, माजलगाव, बीड, तुळजापूर, परभणी यासह अनेक मतदारसंघात शिक्षण संस्थाचालक निवडणुकीमध्ये असल्याने शिक्षक प्रचारकामी वापरले जात असल्याचे सांगण्यात येते.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश साेळंके, सतीश चव्हाण सचिव असणाऱ्या शिक्षण संस्थांचे मराठवाडाभर जाळे आहे. या संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक, प्राध्यापक आता माजलगाव व गंगापूर तालुक्यात प्रचार करू लागले आहेत. घनसावंगी मतदारसंघात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रमूख राजेश टोपे असल्याने त्यांच्या संस्थेतील काही जणांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालवले जातात. परभणीमधील डॉ. राहुल पाटील यांच्या शिक्षण संस्थेच्या वतीने महाविद्यालये चालविली जातात. या महाविद्यालयांमधील शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी आपले संस्थाचालक निवडून यावेत यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. काही मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटीसह निवडणुकीतील अनेक कामे शिक्षकांकडून करुन घेतली जात आहेत.

हेही वाचा :मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

साखर कारखाने आणि शिक्षक संस्था चालविणारेच बहुतांश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मराठवाड्यातील प्रचारात शिक्षक पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात येते. औरंगाबाद शहरात निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना कॉग्रेसने आधी उमेदवारी दिली होती. ती नंतर काढून घेतली. मात्र, त्यांच्या प्रचारातही शिक्षक उतरले होते. सत्तार यांच्यावरील कारवाईमुळे मराठवाड्यात शिक्षक प्रचाराची चर्चा जोर धरू लागली आहे.

Story img Loader