छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्रसिंह यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी संभाजीनगरमध्ये येणार आहेत. मंडळ प्रमुख, विधानसभांचे प्रभारी तसेच निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी हे नेते संवाद साधणार आहेत. याच काळात आरक्षण मागणीचा सूर पुन्हा उंचावला जात आहे.
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी २६ जागांवर भाजपचा दावा आहे. भाजपची ताकद आणि कमळ चिन्हावरील विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांना आधीच पाठविण्यात आले होते. हे कार्यकर्तेही मंगळवारी होणाऱ्या बैठकमध्ये सहभागी होणार आहेत. महायुतीमध्ये कोणत्या जागा कोणाला याबाबतची बोलणी सुरू असताना मराठवाड्यात आरक्षण मागणीचे सूर पुन्हा उंचावला जात आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपचे १६ आमदार होते. फुटीपूर्व शिवसेनेचे ११ आमदार होते. मात्र, फुटीनंतर नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. तसेच राज्यातील राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटातील सहा आमदार आता महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ४६ पैकी ३१ आमदार महायुतीचे आहेत. नव्या राजकीय रचनेत महायुतीमधील राजकीय जागावाटप होणे बाकी असताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्यांनी उमेदवारीसाठी नव्याने दावे सांगितले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर बीड जिल्ह्यातील आष्टी, माजलगाव या मतदारसंघाचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघ भाजपकडून सोडला जाईल हे आता परळीतील भाजप कार्यकर्त्यांनीही मान्य केले आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीचे दहा दिवसांत जागावाटप; शरद पवार यांचे प्रतिपादन
मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मतदारसंघातील प्रश्न, निवडणूक प्रचाराचे प्रमुख मुद्दे यावर चर्चा होण्याची श्क्यता आहे. मराठवाड्यातून पुढे आलेल्या आरक्षण प्रश्नावर भाजपचे नेते कोणती भूमिका घेतात, यावर मराठवाड्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल असे मानले जात आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी मंगळवारीची बैठक महत्त्वपूर्ण असेल असे सांगण्यात येत आहे.