छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा एका बाजूला सुरू असताना मराठवाड्यात काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी या कारणाने अर्ज संख्या वाढली असून मुलाखतीसाठीही गर्दी वाढली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजी आमदार वजाहत मिर्झा, खा. डॉ. कल्याण काळे व युसूफ शेख यांनी घेतल्या. शहरातील औरंगाबाद पूर्व किंवा मध्य मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराचा शोध काँग्रेसकडून घेतला जात आहे. खासदार कल्याण काळे यांचे वर्चस्व असणाऱ्या फुलंब्री मतदारसंघात त्यांचे बंधू जगन्नाथ काळे यांनीही उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे जालना मतदारसंघात उमेदवारीवारुन हाणामाऱ्या आणि राडा झाला. २०१९ मध्ये मला तिकिट नको म्हणणारे उमेदवार आता उमेदवारीसाठी हमरीतुमरीवर आले आहेत.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल करून मुलाखत दिली. या मतदारसंघात अर्ज करणारे सर्व दहा इच्छुक उमेदवार मुस्लिम असल्याचे दिसून आले. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराने चुकीचा अर्ज दाखल केल्याने निवडणुकीमधून पंजा हे चिन्ह गायब झाले होते. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षास सोडण्यात आली होती. या मतदारसंघातून १७ जणांनी उमेदवारी मागितली. सिल्लोडमधून पाच, कन्नडमधून एकमेव नामदेवराव पवार यांनी अर्ज दाखल करून मुलाखत दिली. फुलंब्री मतदारसंघातून १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खासदार कल्याण काळे यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघातून जगन्नाथ काळे, विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्या. पैठणमधून केवळ चार, गंगापूरमधून किरण पाटील डोणगावकरांसह तीन वैजापूरमधून तीन जणांनी अर्ज दाखल केले. वातावरण चांगले असल्याने महाविकास आघाडीची सत्ता यावी असे आमचे प्रयत्न आहेत. कोणता मतदारसंघ, कोणता उमेदवार यापेक्षाही निवडून येणारा महाविकास आघाडीतील व्यक्ती कोण याकडे आम्ही लक्ष देत आहोत.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये डॉक्टरांना आमदारकीचा वेध

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत काँग्रेस तशी कमकुवत झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यात विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनीही औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अर्ज दाखल केला. वजाहत मिर्झा यांनी मुलाखतीच्या अनुषंगाने बोलताना सांगितले की, ‘आता वातावरण उत्तम आहे. उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. १० तारखेपर्यंत जिल्हा पातळीवरील उमेदवारांच्या शिफारशी प्रदेश कार्यालयाकडे केल्या जाणार आहेत. त्यानंतर जागा वाटपाच्या हिशेबात त्यावर निर्णय होतील.’

हेही वाचा – बुलढाण्यात यश मिळविण्यासाठी ठाकरे गट सक्रिय

काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळेस आज आमदार कैलास गोरंट्याल आणि इच्छुक उमेदवार अब्दुल हफीज यांच्या समर्थकांसह मोठा गोंधळ उडाला. पक्ष निरीक्षक शोभा बच्छाव आणि खासदार कल्याण काळे यांच्यासमोर हा गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. मुलाखती सुरू होण्यापूर्वी उडालेल्या या गोंधळाने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली.