पिंपरी : महायुतीमधील घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रबळ दावेदारीनंतरही मावळमधून पुन्हा उमेदवारी मिळविण्यात यश आल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर आता या दोन पक्षांतील नेत्यांचे मन वळविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी नाराज नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात करून त्यांना प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन करताना बारणे दिसत आहेत. आता भाजप, राष्ट्रवादीचे नेते प्रचारात उतरतात, की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळवर तिन्ही वेळेस एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व राहिले. शिवसेना दुभंगल्याने महायुतीतील घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळच्या जागेवर प्रबळ दावा केला होता. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उघडपणे बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, तर भविष्यातील राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही कार्यकर्त्यांच्या आडून विरोधी सूर आळवला होता. बारणे यांना उमेदवारी दिली तर, आम्ही नोटाला विक्रमी मतदान करू असे जाहीरपणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते. मावळमध्ये १५ वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार द्यावा, उमेदवार कोणीही असो पण चिन्ह कमळ असावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.

हेही वाचा : रत्नागिरी – सिंधुदुर्गात उमेदवारीसाठी किरण सामंत अजूनही आशावादी

भाजप, राष्ट्रवादीतील मावळ, पिंपरी-चिंचवडमधून इच्छुकांची मांदियाळी निर्माण झाली होती. बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी इच्छा दर्शविली. परंतु, महायुतीत मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले. पुन्हा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. बारणे तिसऱ्या वेळी धनुष्यबाणावर निवडणुकीला सामोरे जात असले, तरी आता परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेतील फुटीचा जनतेमध्ये रोष असल्याचे सांगितले जाते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या वेळी बारणे यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मावळमध्ये शिवसेनेची मर्यादित ताकत होती, त्यातच दोन शकले झाल्याने शिवसैनिक दोन गटांत विभागले आहेत. त्यामुळे बारणे यांची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आणि भाजप, राष्ट्रवादीच्या मदतीवर असेल. भाजपच्या बळावरच त्यांनी दोनदा बाजी मारली. मावळमधील सहाही मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. हा बारणे यांच्यासाठी दिलासा आहे. मात्र, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन युतीचा धर्म पाळण्यासाठी वळवणे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारणे यांनी सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या आणि सलग तीन वेळा चिंचवडमधून निवडून आलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील स्मृतिस्थळी भेट दिली. आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची शनिवारी भेट घेतली, तर उमेदवारीला तीव्र विरोध करणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांची तळेगाव दाभाडे ) भेट घेणार आहेत. या गाठीभेटीनंतर घटक पक्षाचे नेते प्रचारात उतरतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval lok sabha mahayuti candidate shrirang barne meeting with allies ahead of election print politics news css