पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजपने मावळवर दावा सांगत आमदार शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावही केला आहे. भाजपचे मावळ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मावळमध्ये महायुतीमध्येच रस्सीखेच असून आमदार शेळके यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी १९५७ ला जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी आणि १९७२ ला कृष्णराव भेगडे निवडून आले होते. १९५७ व १९७२चा अपवाद वगळता १९६२, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० या सहा निवडणुकीत काँग्रेस पक्षानेच मावळ मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे पूर्वी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. त्यावर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रुपलेखा ढोरे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. भाजपने काँग्रेसमधील बंडखोरीचा फायदा घेतला. तसाच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये भाजपमधील बंडखोरीचा फायदा घेतला. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ला ‘महालक्ष्मी’ने उत्तर? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेशाची शक्यता

पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर मावळचा राष्ट्रवादीचा आमदार झाला. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर आमदार शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीकडून शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच भाजपने त्यांना कडाडून विरोध सुरु केला. आमदारांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला, गळचेपी केल्याचा आरोप करत शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावच भाजपने यापूर्वीच मंजूर केला. भाजपनंतर आता स्वपक्षातून आव्हान निर्माण झाले आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागणे गुन्हा नाही. गेल्यावेळीही मी उमेदवारी मागत होतो. परंतु, पक्षाने आयात उमेदवार घेतला. उमेदवार आयात केला म्हणून विरोध केला नाही. पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकनिष्ठेने काम केल्याचे त्यांनी म्हटले. तर, विद्यमान आमदारांनी एकवेळा संधी देण्याची मागणी केली होती, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. पण, असे आपण बोललो नव्हतोच असे आमदार शेळके यांचे म्हणणे आहे. शेळके यांना उमेदवारी मिळाल्यास बापूसाहेब भेगडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष अन् भाजपात वाद का पेटला? चर्चेत आलेले जेपी सेंटर नेमके काय आहे?

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर

मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या मावळमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बापूसाहेब भेगडे,भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे, रवी भेगडे उपस्थित नव्हते. त्यावर अजित पवार यांच्या विरोधात गावागावांत जाऊन अपप्रचार, त्यांची बदनामी करत असल्याचे भांडे फुटेल म्हणून काहीजण कार्यक्रमाला आले नाहीत. अजित पवारांनी मावळमध्ये विकास कामे केली नाहीत म्हणून निवडणूक लढवयाची आहे का? विकासाचा रथ थांबविण्यासाठी आमदारकीचे स्वप्न पडत असतील तर जनता पूर्ण करणार नाही असे म्हणत आमदार शेळके यांनी इच्छुकांवर निशाणा साधला होता. त्यातून महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.